मिलिंद पाटणकर रिचेबल; कर्नाटकातल्या मंगळुरुमध्ये घेताहेत विश्रांती

December 25, 2013 10:06 PM0 commentsViews: 663

thane25 डिसेंबर : ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर सध्या कर्नाटकातल्या मंगळुरुमध्ये असल्याचं त्यांनी आयबीएन लोकमतशी फोनवरुन बोलताना सांगितलं. महापालिकेत झालेल्या राडाप्रकरणानंतर पाटणकर गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते, आज मात्र अखेर रिचेबल झाल्यानं, त्यांच्याकडून अनेक प्रश्नांना उत्तरं मिळाली. पाटणकरांचं अपहरण झालं अशी चर्चा सुरु होती. परंतु, तसा काहीच प्रकार नसून, आपण कर्नाटकातल्या मंगळुरुला सुखरुप आहोत, असं पाटणकर यांनी आयबीएन लोकमतशी फोनवरुन बोलताना सांगितलं.

शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या श्रीमुखात भडकावली होती, अशी बातमी छापून आली होती. मात्र त्यात काही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण पाटणकर यांनी दिलं. परंतु, आपल्याच पक्षातले लोक माझी बदनामी करताहेत, असा थेट आरोप त्यांनी पक्षातल्या नेत्यांवर केला. महापौरपदाच्या निवडणुकीतही माझ्यावर असाच आरोप करण्यात आला होता आणि आताही असाच आरोप माझ्यावर झाला, असं पाटणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. या सगळ्या बदनामीमागे महापालिकेतले गटनेते संजय वाघुले आणि भाजपचे नेते संदीप लेले असल्याचा आरोप मिलिंद पाटणकर यांनी केला आहे. याबाबत वारंवार पक्षश्रेष्ठींकडे आपण तक्रार केली आहे. आता त्यावर पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील, असंही पाटणकर म्हणाले.

येत्या दोन-चार दिवसात मी ठाण्यात परतणार आहे. पण दरम्यानच्या काळात माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही, अशी स्पष्टोक्ती पाटणकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. पाटणकर यांच्या दालनाची तोडफोड झाल्यानं भाजप-सेनेमध्ये तणाव निर्माण झाला का ? अशी चर्चा सुरु होती. मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असं सांगून शिवसेनेनं त्यावर बोलण्याचं टाळलं आहे.

close