बाबा आमटे यांची जन्मशताब्दी

December 26, 2013 1:55 PM0 commentsViews: 114

26 डिसेंबर : माणूस माझे नाव…
दहा दिशांच्या रिंगणात या पुढेच माझी धाव ही कविता आहे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची. कृष्ठरोगीच नव्हे तर समाजाने वाळीत टाकलेल्या अनेकांच्या आयुष्यात आनंदवन फुलवणारे बाबा आमटे.

बाबांचा जन्म 26 डिसेंबर 1914 चा. आजपासून बाबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय.

मुरलीधर आमटे म्हणजे सगळ्यांचे बाबा आमटे. ज्यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजाला भरभरून दिलं. चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा गावात बाबांनी आनंदवन उभारलं. समाजातील तळागाळाच्या लोकांना एकत्र आणून जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखवला. बाबांनी कुठल्याही अपेक्षेशिवाय कार्य केलं. जेव्हा लोकं आपापसात भांडत होते सगळे एकमेकांच्या जीवावर उठले होते त्यावेळी बाबांनी भारत जोडोचा नारा दिला आणि तरुणांच्या मनात देशभक्ती जागवली. म्हणूनचं बाबांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात युवकांची त्यांना खूप साथ लाभली. खरे तर हा जातीचा श्रीमंत खानदानी माणूस, पण गांधीवादाची कास धरून आयुष्यभर सेवाव्रती राहिला. सरकारी मदत असो की नसोे, कष्टाचे डोंगर उपसत, सुखासीन आयुष्याला फाटा देऊन, जिद्दीनं बाबांनी कुष्टरोग्यांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवले. नर्मदा बचाओ आंदोलनासारख्या कित्येक आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या आभाळाएवढ्या कार्यामुळे त्यांना रॅमन मॅगासेस अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच त्यांना आंतरराष्ट्रीय गांधी शांती पुरस्कारही देण्यात आला. पण त्यांनी कुठल्याही पुरस्काराचा विचार न करता त्यांचं कार्य सुरू ठेवलंं. बाबा गेले… तो दिवस होता 9 फेब्रुवारी 2008. पण बाबांचा वारसा आजही आनंदवन. तो सोमनाथ तसंच हेमलकसाच्या रुपाने दिवसेंदिवस समृद्धच होतोय.

”माणूस सांधतो आम्ही”चा नार्‍या देणार्‍या बाबा आमटेंच्या स्मृतींना आयबीएन लोकमतचं अभिवादन.

close