मुख्यमंत्री होण्याआधीच अधिकार्‍यांमध्ये घबराट

December 27, 2013 2:43 PM0 commentsViews: 4851

27 डिसेंबर :अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होणार या भीतीपोटी काही भ्रष्ट अधिकार्‍यांचे धाबे दणाणलेले दिसत आहेत. एका हिंदी न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काँग्रेसचे नेते अरविंद सिंग लव्हली यांच्या ऑफिसमध्ये प्रशासकीय अधिकारी काही फाईल्स फाडताना सापडले आहेत. आम आदमी पार्टीने हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचार लपवण्यासाठी काँग्रेस नेते आटापिटा करत असल्याचं म्हटलं आहे.राज्याच्या मुख्य सचिवांनी सगळ्या फाईल्सच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणीही केजरीवाल यांनी केलीय.

लव्हली हे शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री होते. पण, त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्यापासून आपण ऑफिसमध्ये गेलोच नाही आणि त्या फायलींशी आपला काही संबंध नाही, असंही लव्हली यांनी म्हटलंय. केजरीवाल यांनी मात्र ज्या खासगी शाळा पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांकडून मोठ्या देणग्या उकळतात त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याची घोषणा केली.

close