दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल !

December 28, 2013 12:20 PM0 commentsViews: 2319

delhi shapat kejriwal28 डिसेंबर : दिल्ली आणि संपूर्ण देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय. दिल्लीच्या तख्तावर ‘आम आदमी’ विराजमान झालाय. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असून दिल्लीत आता ‘आम आदमी’चे सरकार स्थापन झाले आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल आणि त्यांच्या सहा मंत्र्यांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शनिवारी ठरल्याप्रमाणे आम आदमी पार्टीचा शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर पार पडला. या सोहळ्यासाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांसह दिल्लीकरांनी मोठी गर्दी केली होती. अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा पार पडला. केजरीवाल यांनी सुरुवातीपासूनच शपथविधी सोहळा साध्यापद्धतीने व्हावा याकडे लक्ष घातलं होतं. यासाठी केजरीवाल यांच्यासह ‘आप’चं मंत्रिमंडळ मेट्रो रेल्वेने प्रवास करून रामलीलावर पोहचले. रामलीला मैदानावर आपच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. हातात तिरंगा ध्वज घेऊन जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणा करुन आसंमत दणाणून सोडले. शपथविधीनंतर केजरीवाल यांचं भाषणही झालं. हा क्षण ऐतिहासिक आहे आणि हा शपथविधी अरविंद केजरीवाल आणि टीमचा नसून दिल्लीच्या जनतेचा आहे अशी भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली. शपथ घेतल्यानंतर केजरीवाल पहिल्यांदा राजघाटवर गेले. आणि त्यांनी गांधीजींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर केजरीवाल आपल्या कार्यालयात दाखल झाले. आणि मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतला.
मात्र या शपथविधी सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि किरण बेदी गैरहजर होते. आपली तब्येत ठीक नसल्यामुळे शपथविधीला गैरहजर राहत असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं असून केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. केजरीवाल जे राजकारण करत आहे ते योग्य आहे. जनतेची सेवा करणे हेच खरं राजकारण आहे असं मत अण्णांनी पत्र लिहून व्यक्त केलंय.

close