‘आप’ची वचनपूर्ती,दिल्लीकरांना 20 हजार लिटर मोफत पाणी !

December 30, 2013 6:33 PM0 commentsViews: 922

cm kejrival delhi30 डिसेंबर : दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कामाला धडाकेबाज सुरूवात केली. वचनपूर्ती करत केजरीवाल यांनी दिल्लीकरांना नव वर्षाची मोठी भेट दिलीय. 1 जानेवारीपासून दिल्लीकरांना प्रति दिवस 700 लिटर प्रमाणे महिना 20 हजार लिटर मोफत पाणी मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास कर लागू होणार आहे. मात्र मोफत पाणी किती दिवस दिले जाणार याबाबत संमभ्र कायम आहे.

‘आम आदमी’ने आपल्या जाहिरनाम्यात सत्तेवर आल्यावर दिल्लीकरांना प्रति दिवस 700 लिटर मोफत पाणी देणार असं आश्वासन दिलं होतं. अखेर केजरीवाल यांनी दिलेलं वचन पाळत दिल्लीकरांचा पाण्याचा मार्ग मोकळा केलाय. केजरीवाल यांची तब्येत ठीक नसतानाही आपल्या निवासस्थानी दिल्ली जलबोर्डाचे सदस्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत दिल्लीकरांना प्रति दिवस 700 लिटर प्रमाणे 20 हजार लिटर मोफत पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, या धोरणाचा गैरवापर होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. ज्या नळांना मीटर आहेत त्यांनाच ही सुविधा देण्यात येणार आहे. मात्र, ही सुविधा किती काळ देणार यावरून थोडा संभ्रम आहे. ही सुविधा तीन महिने दिली जाईल, अशी माहिती दिल्ली जलबोर्डाचे सीईओ विजय कुमार यांनी दिली. तर याला कोणतीही कालमर्यादा असणार नाही, असं आम आदमी पार्टीचे नेते, कुमार विश्‍वास यांनी म्हटलं आहे. दिल्ली सरकारचा हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. आपनं यासंबंधी जाहीरनाम्यात आश्‍वासन दिलं होतं.

या निर्णयासोबतच केजरीवाल यांनी ‘आप’ला सक्रीय पाठिंबा देणार्‍या ऑटो रिक्षा चालकांनाही त्यांनी दिलासा देणारा निर्णय घेतलाय. नवीन वर्षात एनसीआरमध्ये साडेपाच हजार नव्या ऑटो रिक्षांसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे दिल्ली आणि नवी दिल्लीत जाणं-येणं आणखी सोपं होणार आहे. दरम्यान, काँग्रेसनं मात्र या निर्णयावर टीका केली आहे. आधी संपूर्ण दिल्लीला पाणी द्या, मग 700 लिटर मोफत पाणी देण्याचा विचार करा असा सल्ला काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी दिलाय.

close