शहीद पोचीराम कांबळेंच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

December 30, 2013 7:22 PM0 commentsViews: 525

30 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील पहिले शहीद म्हणजे पोचीराम कांबळे..विद्यापीठ नामांतराचं राजकारण करत श्रेय घेत अनेक नेते मोठे झाले, पण शहीद पोचीराम कांबळे यांचं कुटुंब आज हलाखीचं जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकार आणि आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनाही वेळ नाही. नामांतर चळवळ यशस्वी झाली पण जे शहीद झाले त्यांचे कुटुंब मात्र जगण्यासाठी धडपडत आहे. आयबीएन लोकमतने याबाबत बातमी प्रसारित केली. या बातमीची दखल घेऊन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्ष रमेश कदम यांनी पुढाकार घेऊन तातडीने आर्थिक मदत जाहीर केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा..आणि या नामांतर चळवळीतील पहिले शहीद पोचीराम कांबळे..नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात टेंभुर्णी गावातून त्यांनी जयभीमचा नारा दिला आणि चळवळ आक्रमक केली. याचा राग येऊन त्यावेळी जातीयवादी गुंडांनी, पोचीराम कांबळे यांची निर्घुण हत्या केली. पोचीराम कांबळे यांच्या हत्तेनंतर नामांतर चळवळ अधिक वेगाने अग्रेसर झाली. अखेर 1994 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर होऊन लढा यशस्वी झाला. पण या लढ्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या पोचीराम कांबळे यांचे कुटुंब आज हालाखीचे दिवस जगत आहेत.

नामांतर लढ्याचं राजकारण करत चळवळीतील आणि सरकारमधील नेते आमदार खासदार झाले. पण जे नामांतरासाठी शहीद झाले त्यांचे कुटुंब आजही खुडाच्या झोपडीत राहत आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुठल्याच नेत्याला वेळ नाहीये. नामांतर दिवस जल्लोषात साजरे करणारे नेते आजतरी या शहीद कुटुंबाकडे लक्ष देणार आहेत का ?

close