सोनई हत्याकांडाला वर्ष , पीडित अजून न्यायाच्या प्रतीक्षेत !

January 1, 2014 5:14 PM0 commentsViews: 362

sonia caseदीप्ती राऊत, नाशिक

01 जानेवारी : माणुसकीला काळिमा लावणार्‍या सोनई हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण होतंय. पण अजून न्याय मिळालेला नाही ही पीडित कुटुंबांची वेदना आजही कायमच आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावात मेहेतर समाजातल्या तीन तरुणांची अत्यंत अमानुष हत्या करण्यात आली होती. वर्षभर पीडितांच्या कुटुंबांनी न्यायासाठी बरीच वणवण केली. पण अपेक्षाभंगाशिवाय अजून त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. हा खटला अहमदनगर जिल्ह्याबाहेर हलवण्याच्या मागणीकडेही सरकारने डोळेझाकच केलीय.

वीस वर्षांच्या वैशालीनं आता स्वत:ला बरचसं सावरलंय. गेल्या वर्षभरात तिनं बरंच काही गमावलंय. 1 जानेवारी 2013ला तिचा पती कामावर गेला तो परत आलाच नाही.

एखादी जखम नवीन असली तर आपण सगळेच त्याची काळजी घेतो. पण ती जुनी झाली की, ढुंकूनही त्याकडे पाहत नाही. तशी गोष्ट आमच्या केसची झाली आहे अशी व्यथा मयत संदीप थनवारची पत्नी वैशाली हिने मांडली.

खरंच आहे वैशालीचं म्हणणं. सामाजिक न्याय खात्यानं तिला समाज कल्याण विभागात नोकरी देऊन भरपाई करण्याचा प्रयत्न केला, पण न्याय काही अजून मिळालाच नाही.

1 जानेवारी 2013 रोजी संदीप, सचिन आणि राहुल या तीन तरुणांची सोनई गावात अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. इतकंच नाही तर त्यांच्या शरीराचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचाही तेवढाच अमानुष प्रकार घडला. या सार्‍याला जातीभेदाची तीव्र किनार होती. म्हणूनच, घाबरलेल्या पीडितांच्या काही प्रमुख मागण्या होत्या. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी, अहमदनगर जिल्ह्याबाहेर नाशिक किंवा जळगावमध्ये ही केस चालावी अशी मागणी मृतांच्या कुटुंबाने केली होती. पण याबाबत काहीच झालं नाही.

श्रीरामपूर कोर्टात केसच्या तारखा फक्त पडत आहेत. वर्ष उलटलं तरी मुलीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला नाही की, आरोपींचे कॉल रेकॉर्डस तपासले नाहीत.

गेल्या वर्षभराला प्रत्येक दिवस या कुटुंबांसाठी काळरात्र ठरलाय. जातीभेदाच्या तीव्र वादातून आधी यांच्यावर पहिला अन्याय झाला. आणि आता जातीच्या मतांवर राजकारण करणार्‍या सरकारनं यांना न्यायदानात विलंब करून यांच्यावर दुसर्‍यांदा अन्याय केलाय.

खरं तर अहमदनगरमधील तीन नेते राज्यातल्या जनतेचं मंत्रिमंडळात नेतृत्व करतात. पण मराठा मतांना घाबरुन त्यांनीही या प्रकरणी गप्प बसणंच पसंत केलंय. या कुटुंबातल्या सदस्यांनी सरकार दरबारी आतापर्यंत खूप उंबरे झिजवले. राज्याच्या गृहमंत्र्यांपासून केंद्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत..पण आपण दलित असल्यामुळे गृहमंत्री आमच्याकडे लक्ष देत नाहीत. फेब्रुवारीत गृहमंत्र्यांनी म्हटलं होतं, फास्ट ट्रॅक कोर्टातर्फे ही केस चालेल. पण काही केलं नाही असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

आता 10 महिन्यांनंतर तरी गृहमंत्री त्यांच्या आश्वासनाची पुर्तता करणार का हा खरा प्रश्न आहे.