ऑगस्टा हेलिकॉप्टर करार ‘जमिनी’वर

January 1, 2014 11:01 PM0 commentsViews: 282

agusta helicopter01 जानेवारी : वादग्रस्त ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीचा व्यवहार अखेर रद्द करण्यात आलाय. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी तब्बल 3 हजार 600 कोटी मोजून हेलिकॉप्टर्स खरेदी केली जाणार होती. पण या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे हा करार रद्द करण्यात आला.

बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांची बैठक झाली. या बैठकीत करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या करारानुसार ऑगस्टा वेस्टलँड भारतीय हवाई दलाला 12 हेलिकॉप्टर देणार होती. मात्र मागील वर्षी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत करार करण्यात यावा यासाठी कंपनीने भारतातील दलालांना 360 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी सीबीआयने माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. तसंच त्यागी यांचे चुलत बंधू संजीव आणि डोक्सा यांच्यावर फसवणूक आणि लाचखोरीचे आरोप ठेवण्यात आले होते. याचा खरेदी व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप होता. या प्रकरणी संरक्षण मंत्रालय हा करारच रद्द करणार असल्याची बातमी द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केली होती. अखेर हा वादग्रस्त करार आता रद्द करण्यात आला.

close