बदलती माध्यमे !

January 3, 2014 10:03 PM2 commentsViews: 503

sameer chavarkarसमीर चवरकर, एचओडी प्रोडक्शन,आयबीएन लोकमत

नुकतंच आम आदमी सरकार दिल्लीत सत्तेत आलं. प्रत्येक वृत्तवाहिनी, प्रत्येक वर्तमानपत्रानं त्याची दखल घेतली. नव्हे तर ती त्या दिवशीची टॉप स्टोरीच झाली. त्या घटनेचं विश्लेषण झालं. प्रत्येक क्षणाला घडणारी प्रत्येक घटना लोकांपर्यंत पोहोचवताना अनेक गोष्टींचा ऊहापोह झाला. पण एक पत्रकार म्हणून मला या घटनेनं वेगळा दृष्टिकोन मिळवून दिला.

आयबीएन लोकमतच्या माध्यमातून ही घटना लोकांपर्यंत पोहोचवताना अनेक क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात. रामलीला मैदानावरची ती सामान्य दिल्लीकरांची प्रचंड उपस्थिती. शपथविधीला आलेले अरविंद केजरीवाल आणि अन्य मंत्रिमंडळाचा मेट्रोमधला प्रवास. साधेपणाची झलक दाखवणारी केजरीवालांची ती निळ्या रंगाची मारुती व्हॅगनआर कार. मंत्रिमंडळाची चटईवरची बैठक अचानक मला जाणवला तो माध्यमात झालेला बदल आणि त्यामुळे होणारा जनमानसातला त्याचा परिणाम . कारण दोन वर्षांपूर्वी कोणालाही माहीत नसणारे केजरीवाल थेट मुख्यमंत्री झाले.

aap blog
कोणाच्या खिजगणतीत नसणारे त्यांचे काही सहकारी मंत्री झाले. जसं याचं श्रेय त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पुकारलेल्या लढाईला आहे तसेच त्या लढाईला लोकांपर्यंत पोहोचवणार्‍या मीडियालासुद्धा आहे. सुरुवातीला दोघाचौघांचे किंवा आपण म्हणूया एका समुदायानं पुकारलेल्या या लढ्याला जनलढ्याचं स्वरूप प्राप्त करून देण्यात माध्यमाची भूमिका निर्णायक होती. आणि म्हणूनच आपापसात भांडणार्‍या राजकीय पक्षाचे माध्यमांबाबत एकमत दिसत होते. मीडियाची अशा प्रकारे दखल घेतली जाणं हा बदलणार्‍या माध्यमाच्या जगातला खूपच दूरगामी परिणाम आहे. इजिप्तसारख्या देशातही इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि प्रिंट माध्यमं याबरोबर सोशल मीडियाही जनमत बनवतोय आणि सत्ताबदल घडवण्यास कारणीभूत ठरतोय. हे बघितलं की, पूर्वीची माध्यमांची माहिती देणं या मुख्य उद्देशाचा विकास होऊन आता विकासात्मक बातमीदारीच्या दिशेनं मीडियाचं पुढचं पाऊल पडतंय याची अनुभूती येतेय.

235anna in media
सामान्यांना आवडणार्‍या विषयाची दखल घेणं यापेक्षाही जो विषय जनसामान्यांच्या दृष्टीनं आवश्यक असेल तर त्या नावडत्या विषयालाही हात घालणं. तो समजवण्यासाठी अनेक प्रभावी साधनांचा वापर करणं. अशी अनेक वैशिष्ट्‌ये मला या निमित्तानं बदलणार्‍या माध्यमातून दिसून येत आहे. लोकलमध्ये प्रवास करताना भेटणारी मित्रमंडळी आणि वर्तमानपत्रातील बातमीवर चर्चा करणारी अनेक चाकरमानी मंडळीसुद्धा माध्यमाविषयी आपुलकीने बोलताना दिसतात, भेटतात. म्हणूनच दिल्लीतल्या आम आदमी पार्टीकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा ठेवणार्‍या सर्वसामान्यासारखीच माध्यमाकडून सकारात्मक अपेक्षा ठेवणार्‍या माध्यमप्रेमीची संख्या वाढताना दिसतेय. मला वाटतं की, ही एका चांगल्या बदलाची सुरुवात आहे.

 • umesh jadhav

  जनसामान्यांना योग्य काय किंवा अयोग्य काय हे
  ठरवण्याचा अधिकार माध्यमकर्त्यांना कोणी दिला.ज्या आंदोलनांमुळे माध्यमं आपली पाठ
  थोपटून घेत आहेत त्या आंदोलनाला विरोध करणारे मोर्चेही दिल्ली आणि इतरत्र निघत
  होतेच पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं कारण विरोध करणाऱ्यांचा आवाज
  क्षीण होता आणि संख्याबळही कमी होतं म्हणून काय त्यांची साधी नोंदही घेतली जाऊ
  नये.इथे कोण बरोबर आणि कोण चूक हा मुद्दा नसून ज्यांच्या हातात माध्यमं आहेत
  त्यांचा काय दृष्टीकोन आहे हे महत्वाचं असतं.त्यांच्या मानसिकतेच प्रतिबिंब हे
  प्रत्येक वृत्तवाहिनीवर आम्ही पाहिलं.अगदी भारावून गेलेले विविध वाहिन्यांचे
  पत्रकार आणि संपादक दिवस रात्र जंतर मंतर आणि रामलीला वर तळ ठोकून होते.केवळ
  स्टुडिओत चर्चा करत न बसता ते ह्या आंदोलनात सामील होऊनच वार्तांकन करत होते.खास
  करून संपादक पदावर असलेली मंडळी प्रत्यक्ष घटना स्थळावरून संवाद साधताना याच
  आंदोलनात दिसली यावरून हे आंदोलन त्यांनी किती गांभीर्याने घेतलं होतं याची
  प्रचीती आली. जे साधं आंदोलन होतं त्याची हवा निर्माण करण्यात आली आणि त्या हवेचं
  नंतर वादळात रुपांतर करण्यात आलं.ही माध्यमांची ताकद आम्ही सगळे ओळखून आहोत पण
  त्याचं पाठबळ हे ह्या देशातील प्रत्येक प्रश्नाला आणि पीडिताला तेवढ्याच शक्तीनिशी
  अद्याप पर्यंत मिळालेलं नाही ही दुर्दैवाची बाब आहे.हजारे आणि केजरीवाल यांच्या
  मागे धावणारे हेच पत्रकार संजय दत्तच्या मागे अगदी येरवड्या पर्यंत धावत गेलेलेही आम्ही
  पाहिले.ह्या आंदोलनातून जनतेला काय मिळालं तर हजारेंच्या रुपाने देशाला दुसरे
  गांधीजी मिळाले ज्यांनी सत्याग्रह आणि उपोषण ह्या अहिंसक मार्गाला नवसंजीवनी दिली
  आणि आम आदमी पार्टी आणि केजरीवाल सारखं
  राजकीय नेतृत्व देशाला मिळालं.माध्यमांनी ह्या आंदोलनात केवळ वृत्तांकन न
  करता सगळ्यात मोठ्ठा प्रचारक म्हणून भूमिका पार पाडली.आणि त्याची परिणती ही एका
  राजकीय पक्षाच्या उदयात झाली.माध्यमांचा अतिशय खुबीने वापर करण्यात आला.माध्यमातील
  लोकांना आपण पत्रकारिता करत नसून ह्या लोकांचं सेल्स आणि मार्केटिंग करत आहोत ही गोष्ट
  अजूनही त्यांच्या लक्षात येत नाहीय.

 • shailesh

  माध्यम आणि त्यात काम करणारे पत्रकार नेहमी देश हिता साठीच काम करतात, आम आदमी चं यश आणि त्यांना मिळणारी जनतेची साथ याला हि माध्यमच कारण आहे कारण ते नेहमी सत्य लोकांसमोर ठेवतात .

close