शिक्षक सुट्टीवर, विद्यार्थी वार्‍यावर

January 6, 2014 3:20 PM0 commentsViews: 212

Image img_97002_school_240x180.jpg06 जानेवारी : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेचं नऊ जानेवारीपासून अधिवेशन सुरु होत आहे. त्यानिमित्त राज्यभरातल्या बहुतांश शिक्षकांनी चक्क आठवडाभराची सुट्टी टाकून महाबळेश्वरची वाट धरली आहे. त्यामुळे राज्यभरातल्या हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना आजपासून आठवडाभर अनौपचारिक सुट्टी मिळणार आहे.

दरवर्षी या संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना रजा दिली जाते. अधिवेशन दोन दिवसांचे असले तरी प्रत्यक्ष अधिवेशनाचे आणि नियोजित ठिकाणी जाण्यासाठी आणि तिथून परतण्यासाठी लागणारे दिवस मिळून तब्बल आठवडाभराची रजा टाकून हजारो शिक्षक या अधिवेशनात सामील होतात. त्यामुळे या वर्षीही राज्यातल्या बहुतांश प्राथमिक शाळा सहा ते अकरा जानेवारी दरम्यान बंद राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे यासाठी अधिवेशनाची तारीख 3 वरून 10 जानेवारीपर्यंत पुढे नेण्यात आली .पण यात विद्यार्थ्यांचं मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.

याबाबतीत काय आक्षेप घेतले जात आहेत ते पाहूयात :

  • मुख्यमंत्र्यांनी वेळ बदलल्यामुळे अधिवेशनाची नियोजित तारीख 3 जानेवारी बदलून 10 जानेवारी करण्यात आली. राजकीय पक्ष आणि संघटना एकमेकांना कसं वापरतात याचं हे उदाहरण. शक्तीप्रदर्शन करून संघटना सरकारला लोकानुनयी निर्णय घ्यायला लावतात.
  • ग्राम विकास मंत्र्यांनी अधिवेशनाच्या रजेचं पत्र काढून 6 जानेवारी ते 11 जानेवारी अशी रजा मंजूर केली.
  • संघटना प्रती शिक्षक पाचशे रुपये जमा करुन अधिवेशनाच्या उपस्थितीचं खोटं प्रमाणपत्र घरपोच देतात. त्यामुळे रजा घेणारे सगळे शिक्षक कधीच अधिवेशनाला जात नाहीत. रजा काढलेल्यांची संख्या आणि प्रत्यक्ष हजर असलेल्यांची संख्या याचा हिशेब मांडायला हवा. या फसवणुकीतून या संघटना लाखो रुपये गोळा करतात. पैसे गोळा करणं हाच जणू या संघटनांचा धंदा झालाय.
  • या सुट्‌ट्या नसून रजा आहे असं सांगितलं जातं असलं तरी संघटनांच्या दबावाखाली अधिकारी नंतर रजा नोंदवत नाहीत. गेल्या अधिवेशनानंतर काही तालुक्यात रजा नोंदवल्या गेल्यात का हे तपासून पाहावे.
  • शिक्षण हक्क कायद्यानुसार 800 तास शिकवल्या जात नसल्याची ओरड होत असताना शाळा एक आठवडा बंद राहिली तर प्रति शाळा 30 तासिका कमी होतात. रविवारी शाळा भरवून या तासिका भरुन काढाव्यात अशी तरतूद आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही.
  • सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की ही अधिवेशनं सुट्टीत का घेतली जात नाहीत. सरकार तसा नियम का करत नाही? दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी सहा दिवसांची रजा का याची चर्चा व्हायला हवी.

close