अखेर न्या.गांगुलींचा राजीनामा

January 6, 2014 6:53 PM0 commentsViews: 171

34534 justice ganguly06 जानेवारी : इंटर्नच्या लैंगिक शोषण प्रकरणी माजी न्यायमूर्ती अशोक गांगुली यांना अखेर पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे गांगुली चांगलेच अडचणीत आले होते अखेर आज राज्यपालांना गांगुलींना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केलाय. या प्रकरणी गांगुलींच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. वाढता दबाव पाहता गांगुलींना अखेर पायउतार व्हावे लागले.

12 नोव्हेंबर 13 रोजी ए.के.गांगुली यांच्यावर एका इंटर्न वकील तरुणीने लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्या होता यामुळे एकच खळबळ उडाली होती. कोलकात्याच्या नॅशनल युनिवर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्समध्ये लॉ शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने आपल्या ब्लॉगमध्ये हा गंभीर आरोप केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत भारताचे ऍटोर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टाने यात लक्ष घालावं अशी विनंती केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 3 न्यायाधीशांची एक चौकशी समिती स्थापन केलीय. यात जस्टिस आर. एम. लोढा, जस्टिस एच. एल. दत्तू आणि जस्टिस राजनाथ देसाई यांचा समावेश होता.

या समितीने 5 डिसेंबर 13 रोजी आपला अहवाल सादर केलाय. यात गांगुली यांना दोषी धरण्यात आलंय. तसंच ही घटना घडली तेव्हा ती मुलगी त्यावेळी सुप्रीम कोर्टात नोकरीलाही नव्हती आणि आता जस्टीस गांगुली हे निवृत्त आहेत. त्यामुळे ह्यात सुप्रीम कोर्टाकडून काही कारवाई केली जाण्याची गरज नाही असंही या समितीनं आपल्या अहवालात म्हटलंय. या अहवालात जस्टीस गांगुली यांच्याकडून गैरवर्तणूक झालीये ही गोष्ट पुढे येत असल्याचं समितीनं म्हटलं आहे. मुलीच्या तक्रारीत काही तथ्य आहे का हेसुद्धा या समितीने तपासून पाहिलं. मात्र समितीच्या निर्णयानंतर ऍडिशनल सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंह यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रात पीडित मुलीने दिलेले प्रतिज्ञापत्र उघड केलं. गांगुलींनी आपल्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचे सुचवले, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

काय होता पीडित मुलीचा आरोप

“न्यायमूर्ती गांगुलींनी मला सांगितलं की वेगळ्या खोलीची सोय कदाचित होऊ शकणार नाही. मी त्यांच्याबरोबर एका खोलीत राहू शकेन का, असं त्यांनी मला विचारलं. जेवत असताना त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांना मदत केल्याबद्दल आभार मानले. मी दूर झाले आणि हे स्पष्ट केलं की हा शारीरिक संपर्क मला आवडलेला नाही आणि त्यांची वर्तणूक बरोबर नाही. पण त्यांनी माझ्या पाठीवरून हात काढला नाही आणि मला मिठी मारायला ते पुढे सरसावले. ते माझ्या जवळ आले, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘तू खूप सुंदर आहेस’. मी काही प्रतिक्रिया द्यायच्या आत त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, ‘तुला माहित आहे ना की मी तुझ्याकडे आकर्षित झालोय. तू विचार करत असशील की हा वृद्ध माणूस दारूच्या नशेत बोलतोय. पण मला तू खरंच आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो.’ जेव्हा मी दूर जायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझ्या हाताचं चुंबन घेतलं आणि परत म्हणाले की मी तुझ्यावर प्रेम करतो.”

close