‘स्वाभिमानी’ला महायुतीकडून लोकसभेसाठी दोनच जागा?

January 8, 2014 4:13 PM0 commentsViews: 2986

78 mahayuti and sa08 जानेवारी : महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील झाली खरी पण महायुतीकडून लोकसभेच्या केवळ दोनच जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपात ‘स्वाभिमानी’ची 4 जागांची मागणी असली तरी त्यांची दोन जागांवर बोळवण होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीये.तर लोकसभेसाठी रिपाइंला ठेंगा दाखवण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माढा आणि हातकणंगले या दोन जागा मिळतील. कोल्हापूरची लोकसभेची जागा द्यायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिलाय. कोल्हापुरात शिवसेनेचा प्रभाव चांगला आहे त्यामुळे जागा देण्यास शिवसेनेचा नकार आहे.

तर बारामतीच्या जागेवर भाजपाला धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी द्यायचीय. ही गणितं पाहता स्वाभिमानी संघटनेला दोन जागांवर समाधान मानावं लागणार आहे. ‘स्वाभिमानी’च्या स्वामीनाथन आणि रंगनाथन समितीच्या शिफारसी स्वीकारण्याची अट मान्य करण्यात आली असून त्याबरोबरच राज्यात दुष्काळ धोरण राबवणार असल्याची अटसुद्धा मान्य करण्यात आलीय या अटी मान्य झाल्यानंतर स्वाभिमानीने महायुतीशी हातमिळवणी केलीय.

तर राजू शेट्टी यांना जागावाटपाबाबत नाराज करणार नाही अशी ग्वाही गोपीनाथ मुंडे यांनी दिलीय. मात्र ‘स्वाभिमानी’ला किती जागा देणार हे मुंडेंनी स्पष्ट केलं नाही. दुसरीकडे रिपाइंला जागा देण्यात येतील अशी आश्वासनं दिली खरी पण रिपाइंला राज्यसभेची एक जागा देऊन त्यांचं समाधान केलं जाणार आहे. रिपाइंला लोकसभेसाठी चार जागा देण्याची युतीने तयार दर्शवली होता पण चार जागा देण्यासही आता नकार दिसतोय. यावर तडजोड म्हणून राज्यसभेची एकच जागा रिपाइंला देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपाच्या तिढ्यावरुन महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

close