‘रिलायन्स मेट्रो’च्या फलकाला रिपाइंने काळं फासलं

January 8, 2014 6:44 PM0 commentsViews: 904

rpi on metro08 जानेवारी : मुंबईतील बहुचर्चित मेट्रो रेल्वे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे, पण त्याआधी मेट्रोच्या नामकरणावरुन नवा वाद सुरू झाला आहे. बुधवारी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी स्थानकातील रिलायन्स मेट्रो असं लिहिलेल्या फलकाला काळं फासलं आणि मुंबई मेट्रोचे बॅनर लावले आहे. मेट्रोचं नाव हे मुंबई मेट्रोच असलं पाहिजे ते रिलायन्स मेट्रो असता कामा नये. जर असं झालं नाही तर मुंबई मेट्रो चालू देणार नाही असा इशारा आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी दिला.

एमएमआरडीए आणि सरकारने ‘मंुबई मेट्रो – वन’ असं या मेट्रो प्रकल्पाला नाव दिलं असलं तरीही ‘रिलायन्स’नं दादागिरी करत ‘रिलायन्स मेट्रो अशा पाट्या स्थानकावर लावल्या आहेत. ‘रिलायन्स मेट्रो’ या नावाचे लोगो मेट्रोच्या बोगींना तसंच स्थानकांवरतीही लावण्यात आले आहेत. यासंदर्भात एमएमआरडीएनं रिलायन्सला ‘मुंबई मेट्रो वन’ असंच नाव देण्याचं अधिकृत पत्र पाठवलं आहे. पण रिलायन्सनं मात्र आपली मुजोरी कायम ठेवत रिलायन्स मेट्रोच्या पाट्या कायम ठेवल्या आहेत.

यावर रिलायन्सनं अधिकृत बोलण्यास नकार दर्शवलाय. मात्र त्यांनी इमेलद्वारे आयबीएन लोकमतकडे प्रतिक्रिया पाठवली आहे. त्यात ‘नामकरणासंदर्भात आम्ही दीड वर्षापूर्वी एमएमआरडीएला सर्व अहवाल दिले होते, पण एमएमआरडीएनं त्यावेळेला आम्हांला कोणतेही बदल करण्याच्या सूचना दिल्या नाहीत. आणि आता एमएमआरडीएनं आम्हांला ‘रिलायन्स मेट्रो’ हे नाव काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पण आता हा वाद कशामुळे? एमएमआरडीएला नामकरणाचा मुद्दा इतक्या उशिरा का आठवला?’ असा प्रश्न रिलायन्सनं विचारला आहे. मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अंधेरीच्या मेट्रो स्टेशनवर हल्ला बोल केला. कार्यकर्त्यांनी रिलायन्स मेट्रो वन च्या पाट्यांना काळं फासलं आणि मुंबई मेट्रो असे बॅनर झळकावले आहे. रिलायन्सने नाव मागे घेतलं नाही तर मेट्रो चालू देणार नाही असा इशारा आरपीआयने दिलाय.

close