होमलोनसाठी ग्राहक नाहीत

February 21, 2009 2:02 PM0 commentsViews: 3

21 फेब्रुवारी मुंबईनमिता सिंग बँकांनी ग्राहकांना आशा दाखवत होमलोनचे व्याजदर कमी केले. काही सरकारी बँकांनी ग्राहकांसाठी होमलोनच्या नव्या स्किम्स मार्केटमध्ये आणल्या. पण तरीही होमलोन घेणा-यांच्या संख्येत तसूभरही वाढ झाली नाही. कारण जागांचे भाव आणि व्याजदर आणखी कमी होतील अशी वाट ग्राहक पाहत आहेत.मंदीतून रिअल इस्टेट सेक्टरला वाचवण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे सारे प्रयत्न फोल ठरत आहेत. काही बँकांनी होमलोनच्या व्याजदरात मोठी कपात केली. त्याला बिल्डरांनीही जागेचे भाव कमी करून साथ दिली. पण तरीही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होमलोन घेणा-यांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र ही घट किती प्रमाणात झाली यासंदर्भात बँकांनी बोलण्यास नकार दिला आहे. होमलोनच्या मागणीत घट होण्याचं प्रमाण कमी झालंय ते खरंतर गेल्यावर्षीपासूनच रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक रिपोर्टनुसार 2007 मध्ये बँकांनी हाऊसिंग सेक्टरला अंदाजे 31 हजार 700 कोटींचं कर्ज दिलं होतं. 2008 मध्ये हे प्रमाण 21 हजार 989 कोटी रुपये होतं. मागच्या तीन महिन्यात होमलोनचे व्याजदर एक ते दीड टक्क्यांनी कमी झालेत. एवढचं नाही तर, काही सरकारी बँकांनी वीस लाखांपर्यंतच्या कर्जासाठी व्याजदर आठ ते सव्वा नऊ टक्के केलेत. असं असूनही प्रॉपर्टी मार्केटमध्ये ग्राहक नाहीत. कारण त्यांना व्याजदर आणि जागेच्या किंमती आणखीन कमी होतील अशी आशा आहे. कोटक महिंद्रा बँकेचे होमलोन विभागाचे हेड, कमलेश राव सांगतात, होमलोनची मागणी केवळ दोन गोष्टींमुळे होते. एकतर व्याजदर आणि जागेचे भाव.व्याजदर कमी झालेत. जागेचे भावही कमी झालेत. पण लोकं किमतीत करेक्शनची वाट पाहतायेत.बँका आणखीन व्याजदर कमी करण्याच्या तयारीत आहेत. गरज असेल तर, व्याजदर कमी करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेनंही याआधीच दिलेत. त्यामुळे येत्या मार्च ते मे महिन्याच्या पिक सिझनवर बँकांचं लक्ष लागलंय. कारण या तीन महिन्यात होमलोनची मागणी वाढली नाही तर पुढचे दिवस बँकांना कठीण जाणार आहेत.

close