अन् विद्यार्थीच बनले मास्तर !

January 9, 2014 6:16 PM0 commentsViews: 268

school newsतुषार तपासे, महाबळेश्वर

09 जानेवारी : प्राथमिक शाळांमध्ये परीक्षा तोंडावर आल्या आहेत, पण राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांचा पत्ताच नाहीये. कारण पाचगणीला दोन दिवसांचं अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या नावाखाली हजारो शिक्षक महाबळेश्वरमध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहे.

इंदापूरच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या विद्यार्थीच शिक्षक बनले आहे. कारण यांचे मास्तर सध्या थंड हवेच्या ठिकाणी अधिवेशन करायला गेले आहेत. परीक्षा तोंडावर आल्या असताना मास्तरच वर्गावर नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय.

महाबळेश्वरला राज्य महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीचे 9 जानेवारीपासून अधिवेशन सुरु होतंय. त्यानिमित्त राज्यभरातल्या बहुतांश शिक्षकांनी चक्क आठवडाभराची सुट्टी टाकून महाबळेश्वरची वाट धरलीये. अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षकांचे पर्यटन होत असून विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होणार आहे. दरवर्षी या संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना रजा दिली जाते. अधिवेशन दोन दिवसांचे असले तरी प्रत्यक्ष अधिवेशनाचे आणि नियोजित ठिकाणी जाण्यासाठी आणि तिथून परतण्यासाठी लागणारे दिवस मिळून तब्बल आठवडाभराची रजा टाकून हजारो शिक्षक या अधिवेशनात सामील होतात. त्यामुळे या वर्षीही राज्यातल्या बहुतांश प्राथमिक शाळा सहा ते अकरा जानेवारी दरम्यान बंद राहतील. पण शाळा सुरळीत सुरू राहतील, असा दावा शिक्षकांनी केलाय.

उन्हाळा आणि दिवाळीच्या मिळून शिक्षकांना 1 ते 2 महिन्याच्या सुट्या असतात. मात्र शाळा सुरू असताना अशा प्रकारच्या अधिवेशनाची गरज काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

close