कसाबसाठी आर्थर रोड जेलमध्ये खास व्यवस्था

February 21, 2009 4:14 PM0 commentsViews: 4

21 फेब्रुवारी मुंबई सुधाकर कांबळे मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंकर आणि बुलेटप्रूफ सेल बांधण्यात येतोय. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला या जेलमध्ये ठेवण्यासाठी ही खास व्यवस्था तयार करण्यात येत आहे.अंडा सेल बॅरेक नंबर 4. आर्थर रोड जेलमधला हा पत्ता आहे मोहम्मद अजमल कसाबचा. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी 69 लोकांना ठार मारणारा क्रूर दहशतवादी.भारताच्या ताब्यात असलेला एकमेव पाक अतिरेकी. पाकिस्तानी दहशतवादाचा जिवंत पुरावा. भारतालाच नव्हे तर जगातील अनेक देशांसाठी महत्त्वाचा पुरावा. या पुराव्याचं रक्षण करण्यासाठी मुंबई पोलीस आटोकाट प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कसाबला मुंबई पोलिसांच्या हेडक्वार्टरमध्येच एका खोलीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्याला आर्थर रोड जेलमधील अंडा सेलच्यामध्ये ठेवण्यात आलं आहे.अंडासेलमध्ये एकूण पाच बॅरेक आहेत.बॅरेक नंबर एकमध्ये दाऊद गँगचे गुंड आहेत. बॅरेक नंबर दोनमध्ये छोटा राजन गँगचे गुंड आहेत बॅरेक नंबर तीनमध्ये गँगस्टर अरुण गवळी याला ठेवण्यात आलंय. बॅरेक नंबर चार कसाबसाठी आधीच रिकामा करण्यात आला होता.त्यात त्याला ठेवण्यात आलंय.कसाबला आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यापूर्वीपासूनच त्याच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. त्याला लष्कर-ए-तोयबाकडूनही धमकी आल्याचं बोललं जातंय. आता त्याची सुरक्षा व्यवस्था कशी असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.आर्थर रोड जेलच्या आतमधल्या इमारतीत टाडा कोर्टाचं काम चालायचं. आता इथंच मुंबई हल्ल्याचा खटला सुरू होईल. एक मजल्याच्या या इमारतीच्या बाजूला दोन आणखी इमारती आहेत. एकमजल्याच्या या इमारतींपैकी एका इमारतीत एक बांधकाम वेगानं सुरू आहे. इथंच बंकर स्वरूपातील एक खास सेल बनतोय. हा सेल बुलेट प्रूफ असेल. त्यासाठी स्टील प्लेटस वापरल्या जात आहेत. या एक मजली बॅरेकची पंधरा फूट जमीन खोदण्यात आली आहे. तिथे बंकर जेल बनवण्यात येत आहे. यावेळी जमिनीच्या खालपासून वरपर्यंत सुमारे वीस फूट लोखंडाच्या भिंती बनवण्यात आल्या आहेत. अगदी एके-47 किंवा एके 56 चं काय अगदी रॉकेट लॉचंरच्या माराही या लोखंडी भिंती त्या भेदू शकणार नाहीत. बंकरमध्ये तसंच आर्थर रोड जेलच्या परिसरात ही सीसी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.एवढंच नव्हे तर आर्थर रोड जेलच्या बाहेरील रचनेतही बदल करण्यात येणार आहे.सध्या कंपाऊंडच्या या भिंती पंधरा फुटाच्या आहेत.जेलच्या परिसरात वाढत असलेलं बांधकाम पाहता त्यांची उंची आणखी पंधरा फूट वाढवण्यात येणार आहे. आर्थर रोड जेल कायापालटाचं काम सध्या जोरात सुरू आहे. हे दिवसरात्र सुरू असून त्यासाठी जेलच्या दरवाजावर बांधकाम करणा-या मजुरांचा असा सतत राबता आहे.आणि मुख्य म्हणजे या बांधकामावर जेलचे डीआयजी रजनीश सेठ आणि इतर अधिकारी सतत लक्ष ठेवून आहेत.कोणत्याही परिस्थितीत कसाबच्या जीवाला धोका पोहचता कामा नये यासाठी पोलीस ही काळजी घेत आहेत.

close