राज ठाकरेंनी घेतली शिलेदारांची झाडाझडती

January 11, 2014 9:21 PM0 commentsViews: 2428

raj angrey11 जानेवारी : ऐन निवडणुकांच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये विकास कामांचं शुभारंभ केलं खरं पण आपल्या शिलेदारांनी आतापर्यंत काहीही पराक्रम गाजवला नसल्यामुळे राज ठाकरे चांगलेच संतापले. त्यामुळे राज यांनी झोडून सर्वच पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन चांगलीच झाडाझडती घेतली. मोठं-मोठी आश्वासनं दिली मग कामं का झाली नाही असा जाब राज यांनी विचारला.

महाराष्ट्राची ‘ब्लू प्रिंट’ दाखवणारे राज ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे नाशिकमध्ये मनसेने भाजपसोबत घरोबा करुन दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर सहा महिने उलटले, वर्ष उलटले पण कामाचा पत्ताच नसल्यामुळे विरोधक आणि सर्वसामान्यांनी हीच का ‘ब्लू प्रिंट’ असा सवाल राज यांना विचारला. पण राज यांनी ठाकरी टोला लगावत आपल्याला पाच वर्षानंतर याबद्दल विचारा असं उत्तर दिलं. त्यामुळे आता काय बोलायचं असा प्रश्नच नाशिकरांनी उपस्थित केला. आता लोकसभेची निवडणूक एप्रिलमध्ये होणार हे निश्चित झालंय.

इतर पक्ष मोर्चेबांधणीला लागलेही त्यामुळे राज  ‘कृष्णकुंज’वरुन बाहेर पडून थेट नाशिकनगरी गाठली. थंडीमुळे गोठलेल्या ‘इंजिन’ला ‘स्टार्ट’ करत पहिल्याच दिवशी राज यांनी भरधाव गाडी चालवली. आपल्या सभांमधून गुजरातच्या विकासाचा पाढा वाचणारे राज यांनी आपले मित्र नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली. पीएम होण्यासाठी सीएमची खुर्ची सोडा असा सल्लावजा टोलाच राज यांनी लगावला. राज यांची टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली. आणि झोंबणार का नाही. एकतर घरोबा त्यात आपल्याच राष्ट्रीय नेत्यावर टीका त्यामुळे नाशिकच्या भाजपच्या 14 शिलेदारांनी मनसेशी युती तोडून टाका असा फर्मानच वरिष्ठांना धाडला. पण राज यांनी यावर सावध भूमिका घेतली.

नियोजित ठरलेल्या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी राज अनेक वार्डात हजर झाले आणि विकास कामाच्या नावानं चांगभलं म्हणत कुदळ मारली. पण इथं ही माशी शिंकली. गेल्या दोन वर्षात शिलेदारांनी नुसती ‘द्राक्ष’च खाल्यामुळे राज यांचं तोंड कडू झालं. त्यामुळे संतापलेल्या राज यांनी सर्वच शिलेदारांना चांगलंच फैलावर घेतलं. मोठं मोठी आश्वासनं देऊन नाशिकमध्ये मनसे सत्तेवर आली. पण, जनतेची कामं होत नसल्याची ओरड सर्वच स्थरांतून होत असल्याने राज यांनी पदाधिकार्‍यांना जाब विचारला. भेदरलेल्या ‘वाघ’ यांनी महिन्याभराची मुदत मागितली. महिनाभर द्या सर्व कामं आम्ही पार पाडून दाखवू अशी ग्वाही ‘वाघां’नी दिली. असो..राज यांचा नाशिक दौरा आज संपला पण गेल्या तीन दिवसाच्या नाशिकच्या थंडीत ‘राज’कीय गर्मीमुळे राज्यभरात चांगलीच करमणूक झाली.

close