पुण्यात ‘श्रेयाचं राजकारण’

January 13, 2014 1:15 PM0 commentsViews: 363

अद्वैत मेहता, पुणे
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं श्रेयाचं राजकारण, कुरघोडी, आणि शह-काटशहाला ऊत आलाय. पुण्यातल्या कात्रज तळ्यातल्या म्युझिकल फाऊंटनचं उद्घाटन तसंच सारसबागेजवळच्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यावरच्या मेघडंबरीच्या उद्घाटनावरून असाच वाद रंगलाय.

कात्रज तळ्यात 4 कोटी रुपये खर्चून सिंगापूरच्या धर्तीवर देशातलं पहिलं म्युझिकल कारंजं बांधण्यात आलं आहे. त्याचं उद्घाटन राज ठाकरेंच्याच हस्ते करण्याचा मनसुबा मनसे नगरसेवकांनी जाहीर केला. पण राष्ट्रवादीनं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर केला. सोबतच सारसबागेजवळच्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यावरच्या मेघडंबरीचं उद्घाटनही 12 जानेवारीला अजित पवारांच्या हस्ते होत असल्याचंही राष्ट्रवादीनं जाहीर करून टाकलं.

या सर्व कामाचं श्रेय मनसेचं आहे असं सांगत मनसे गटनेत्यांनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करून दाखवाच, असं आव्हान राष्ट्रवादीला दिलंय. तर काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांनीही मातंग समाजाच्या अस्मितेशी खेळू नका, असं सांगत मेघडंबरीचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा दिलाय.

निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचं उद्घाटन उरकून घेण्यासाठी ही धडपड चाललीय. आणि त्याचं श्रेय आपल्यालाच मिळावं यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे

close