कोल्हापुरात ‘टोल’फोड, 1500 जणांविरोधात गुन्हे दाखल

January 13, 2014 5:14 PM0 commentsViews: 480

æ¦üŸÖ13 जानेवारी : कोल्हापुरात टोलविरोधी रविवारी कोल्हापूरकरांनी टोल नाक्यांची तोडफोड करून पेटवून दिले. या प्रकरणी जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी पोलिसांनी 1500 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. यात शहराच्या महापौरांसह 3 आमदारांचा समावेश आहे. या आंदोलनात 16 लाखांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे.मात्र याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.

रविवारी संतप्त जमावानं 4 टोलनाक्यांची तोडफोड केली होती. कोल्हापूर टोलविरोधी कृतीसमितीने सहा दिवस उपोषण केलं होतं. रस्ते विकास प्रकल्पांचं पुर्नमुल्यांकन करण्यात येईल आणि टोलची 220 कोटींची रक्कम महापालिकेकडून देण्यात येईल या प्रस्तावावर 12 उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. उपोषण सोडल्यानंतर कोल्हापुरातील सर्व टोल कोणत्याही आदेशाविना बंदही करण्यात आले होते.

मात्र रविवारचा दिवस उजाडत नाही तोच टोल वसुलीला सुरूवात झाली. त्यामुळे संतप्त कोल्हापूरकांनी टोलनाक्यांवर हल्लाबोल केला. संतप्त नागरिकांनी 4 टोलनाक्यांची अक्षरश: राखरांगोळी केली. जमावांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांनाही बघ्याची भूमिका घ्यावी लागली. आज सोमवारीही टोल वसुलीच्या निषेधार्थ शिवसेनेनं बंद पुकारला. शिवसेनेनं शहरात महारॅली काढली. त्यात कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतलाय. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पोस्टर जाळलं. त्यामुळे पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटही झाली. टोलचा खर्च राज्य सरकारनं उचलावा. महापालिकेकडे तितकी क्षमता नाही अशी मागणी स्थानिक शिवसेना आमदारांनी आता केली आहे.

close