शिवसेनेतला ‘दुर्योधन’ कोण ?

January 13, 2014 6:56 PM0 commentsViews: 2405

sena mahabharat13 जानेवारी : शिवसेनेत एका नव्या वादावरून महाभारत घडतंय. धृतराष्ट्राच्या नगरीत द्रौपदीच्या हाकेला धावून येणारा कृष्ण कोणी होईल का ? अशी साद शिवसेनेच्या माजी महापौर आणि शिवसेनेतल्या ज्येष्ठ नगरसेविका शुभा राऊळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातली आहे.त्यामुळे शिवसेनेत दुर्योधन कोण आहे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.

एकेकाळी महिलांच्या प्रत्येक मुद्यावर आक्रमक भूमिका घेणार्‍या शिवसेनेला नेमकं काय झालंय, असा प्रश्न आता पडतोय. कारण धमक्या आणि अश्लील फोन येणार्‍या शिवसेनेच्या नगरसेविकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजूनही भेट दिली नाही. त्यामुळेच की काय या नगरसेविकांना सोशल नेटवकीर्ंग साईटवरुन जनाधार गोळा करावा लागतोय. उद्धव ठाकरे यांनी तीन वेळा भेटण्यासाठी वेळ देऊन, नतंर ती भेट नाकारली.

अखेर माजी महापौर आणि शिवसेनेतल्या जेष्ठ नगरसेविका शुभा राऊळ यांनी आपल्या मैत्रीणींच्या मनातली खदखद फेसबुकवर पोस्ट केली. “सावित्रीच्या लेकींच्या लढा चालूच आहे. 21व्या शतकातही…ह्या आंतरराष्ट्रीय नगरीत ह्या लेकी स्थानिक स्वराज्य संस्थेनं दिलेल्या 50% आरक्षणानुसार निवडून आल्या. स्वत:ला सिद्ध करताना येणारे अडथाळे ओलांडत, स्वाभिमानाला सांभाळत, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात ह्या द्रौपदीचे मानहानीरुपी वस्त्रहरण सुरू आहे. ह्या धृतराष्ट्राच्या नगरीत द्रौपदीच्या हाकेला धावून येणारा कृष्ण कोणी होईल का ? अशी साद राऊळ यांनी उद्धव ठाकरे यांना घातलीय.

शुभा राऊळ याच्या या पोस्टला फेसबुकवर चांगला प्रतिसाद मिळतोय. पण या सर्व प्रकरणावर ‘श्रीकृष्णा’ने अर्थात उद्धव ठाकरे यांनी हा दरबारातला अंतर्गत मुद्दा आहे मी त्याबद्दल पाहून घेईन त्याबद्दल कुणी चिंता करू नये असं उत्तर दिलंय त्यामुळे महिलांच्या या प्रश्नाला गांभीर्यानं घेणारा शिवसेनेतला कृष्ण मात्र कधी अवतरेल याची वाट सगेळच जण पाहत आहेत.

close