औरंगाबादमध्ये ‘आप’च्या कार्यालयावर हल्ला

January 14, 2014 4:14 PM0 commentsViews: 1282

aap aurangabad14 जानेवारी : औरंगाबादमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय. शहरातील ज्युबली पॉर्कवर भागातील आपच्या कार्यालयात दुपारी 2 च्या सुमारास अज्ञातांनी घुसखोरी करून फर्निचर, टीव्हीची तोडफोड केली. तसंच कार्यालयातून 25 हजार रुपयांची रोकड पळवल्याचा आरोपही ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

स्वत:ला राष्ट्रवादी कार्यकर्ते म्हणवणार्‍यांनीच तोडफोड केल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आरीफ खान याने फोन करून ‘आप’च्या कार्यालयावरील बॅनर काढला नाही तर तुमची खेर नाही अशी धमकी दिली होती त्यानंतर काही तासात चार-पाच लोकांनी येऊन कार्यालयाची तोडफोड केली अशी माहिती ‘आप’चे कार्यकर्ते हरमित सिंग यांनी दिली.

या आधीही कार्यालय बंद करण्यासाठी धमक्या आल्याचं आपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. देशभरात आम आदमी पक्षाकडून सदस्य नोंदणीची मोहिम सुरू आहे. यासाठी औरंगाबादमध्ये ज्युबली पॉर्क भागात ‘आप’च्या कार्यकर्त्यांने ‘आप’चं कार्यालय सुरू केलं. मात्र ज्या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलं त्या इमारतीच्या मालकाचा मुलगा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याने ‘आप’चं बॅनर काढण्याची धमकी दिली होती. बॅनर काढण्यासाठी अर्ध्यातासाची मुदत ही ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मागितली होती पण काही वेळात चार ते पाच लोकांनी कार्यालयाची तोडफोड केली. हा प्रकार धक्कादायक असून याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे अशी प्रतिक्रिया आपच्या सदस्या अंजली दमानिया यांनी दिली.

close