मनसेला महायुतीत घ्या, राजनाथ यांचा उद्धवना सल्ला

January 15, 2014 6:18 PM0 commentsViews: 1865

rajnath singh415 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या चुलतबंधूंमध्ये पुन्हा ‘टाळी’ वाजवावी यासाठी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी प्रयत्न केलाय. नुकत्याच स्थापन झालेल्या महायुतीमध्ये मनसेलाही बरोबर घ्या, असा सल्ला राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव यांनी आज (बुधवारी) दिल्लीमध्ये भाजपाध्यक्षांची भेट घेऊन सुमारे 40 मिनिटं चर्चा केली. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात ‘आप’चा प्रभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत मनसेमुळे महाराष्ट्रात महायुतीला फटका बसू शकतो, अशी भीती भाजपला वाटतेय. त्यामुळे शक्यतो मनसेला बरोबर घ्या, ते शक्य झालं नाही तर निदान मनसे थेट विरोधात जाणार नाही याची काळजी घ्या असंही राजनाथ सिंहांनी उद्धवना सुचवलंय.

विशेष म्हणजे उद्धव यांनी राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावावर मौन बाळगल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मागिल वर्षी खुद्द उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता पण राज यांनी टाळी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे उद्धव यांनी हात आखडता घेत आता हा विषय संपला असं जाहीर करून टाकलं होतं. पण तरीही भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून टाळीसाठी प्रयत्न सुरूच होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे महायुतीची विशालयुती करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत घेण्याचा निर्णयही भाजपचा होता. त्यामुळे आता राज्यात कोणतही रिस्क न घेण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा टाळी द्याच असा सल्ला दिलाय.

close