पोलिसांच्या बदल्यांना राजकीय फटका!

January 16, 2014 10:02 AM0 commentsViews: 684

IPS16 जानेवारी : सुधाकर काश्यप , मुंबई 

महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक महत्त्वाची पदं रिक्त आहेत, कारण राजकीय वादाचा फटका म्हणून पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याच रखडल्या आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अतिरिक्त पोलीस महासंचालक ते सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरील अधिकार्‍यांना बढत्याही देण्यात आल्या नाहीत. या प्रकारामुळे पोलीस दलात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. यामुळे पोलीस दलात नाराजी व्यक्त केली जातेय. काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधील राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांची बदली खरं तर सहा महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती, पण त्यांना मुंबईचे आयुक्तपद सोडायचे नसल्याने पोलीस महासंचालकपद रिक्त आहे. राज्यात पोलीस महासंचालकपदाची दोन पदं रिक्त आहेत.

एकूण पद

  • पोलीस महासंचालक 6
  • अतिरिक्त पोलीस महासंचालक 24
  • महानिरीक्षक 52
  • उपमहानिरीक्षक 49
  • पोलीस अधीक्षक 290

अशी राज्य पोलीस दलाची रचना आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून या महत्त्वाच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.

रिक्त पद

  • पोलीस महासंचालकांची 2 पदं रिक्त आहेत.
  • अतिरिक्त पोलीस महासंचालकांची 3 पदं रिक्त आहेत.
  • पोलीस महानिरीक्षक पदाची 3 पदं रिक्त आहेत.
  • उपमहानिरीक्षक ( डीआयजी ) पदाची 7 पदं रिक्त आहेत.

पोलीस अधीक्षक पदाची 80 पदं रिक्त आहेत. पण त्या पदाच्या नियुक्ती बाबत सरकार काही करत नाही. डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी अर्थात डिपीसीच्या गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत आयपीएसच्या 1987 बॅचच्या 7 अधिकार्‍यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बढती देण्यात आली आहे.

सुरेंद्र पांडे , बिपीन बिहारी , हेमंत नगराळे, डी. कनकरत्नम , तुकाराम चव्हाण आणि टी.एस.भाल या अधिकार्‍यांना बढती देण्याचा निर्णय झाला आहे.या पैकी टी.एस.भाल यांना बढती देण्यात आली. बाकी 6 जणांना 9 महिन्यांनतर हि बढती देण्यात आलेली नाही.

सध्या पोलीस महानिरीक्षक (डीआयजी) पदावर काम करत असलेल्या 1995च्या बॅचच्या 6 आयपीएस अधिकार्‍यांना पोलीस महानिरीक्षक ( आयजी ) पदावर बढती देण्याचा निर्णय डीपीसीने घतला आहे. यात नवल बजाज , प्रवीण साळुंखे , अमितेश कुमार , विनय चौबे , निकेत कौशिक आणि श्रीकांत तरवडे यांचा समावेश आहे . मात्र, त्यांनाही गेल्या 9 महिन्यांपासून बढती देण्यात आलेली नाही.

काही महिन्यापूर्वी पोलीस महासंचालक एसीबी आणि पोलीस महासंचालक , गृहनिर्माण ही पदं रिक्त होताचं त्या ठिकाणी तात्काळ नियुक्त्या करण्यात आल्या. त्या खालील पदावरील अधिकार्‍यांना मात्र, डावललं गेलंय.

मुंबई पोलीस आयुक्त पद हे मोहात पाडणार पद आहे. या पदावर आल्यावर हे पद सोडावसं आयपीएस अधिकार्‍यास वाटत नाही. अशीच भावना सध्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंग यांची हीअसावी, राज्यात पोलीस महासंचालक दर्जाची दोन पदं गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. डॉक्टर सत्यपाल सिंग यांना खरं तर सहा महिन्यांपूर्वीच बढती मिळायला पाहिजे होती. डॉक्टर सत्यपाल सिंग यांना बढती दिल्यास सर्व प्रश्न निकाली निघतील. पण डॉक्टर सत्यपाल सिंग यांना बढती देण्याची राज्य सरकारमध्ये हिम्मत नाही, एका अधिकार्‍याच्या हट्टापायी राज्य सरकार अख्या पोलीस दलास वेठीस धरत असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

close