‘आप’ काँग्रेसच्या इशार्‍यांवर चालतं -बिन्नी

January 16, 2014 11:14 AM0 commentsViews: 2050

rift-in-aap-national-parties-wooing-vinod-binny-for-lok-sabha-ticket16 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे संदीप दीक्षित यांच्याशी घनिष्ठ संबंध असून दिल्लीची सरकार अजूनही काँग्रेसच्याच इशार्‍यावर चालत असल्याचा घणाघाती आरोप आपचे बंडखोर आमदार विनोद बिन्नी यांनी केजरीवालांवर केला आहे. काँग्रेसमधून आम आदमी पार्टीत आलेले बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढत केजरीवाल आणि टीमला घरचा अहेर दिला आहे.

दिल्लीच्या जनतेला भरघोस आश्वासने देऊन सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या आम आदमी पक्ष हा लोकांची दिशाभूल करत असल्याचंही ते म्हणाले.

‘आप’च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं हा फक्त शब्दांचा खेळ आहे. सत्तेत येण्यापूर्वी राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल स्थापण्याचे आश्वासन देखील केजरीवाल यांनी दिले होतं, मात्र महिलांवरच्या अत्याचारात अजूनही वाढच होत आहे.

दिल्लीत ‘आप’च्या तिकीटवाटपातही मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचंही ते म्हणाले. लोकसभेसाठी आपने आधीच उमेदवारांची यादी निश्चित केलीय मग मतदारसंघामध्ये सह्यांची मोहीम राबवून दिशाभूल का केली जातेय असा प्रश्न देखील बिन्नी यांनी पक्षाला विचारला आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पक्ष निर्माण झाला. आपचं सरकार येऊन महिना पूर्ण होत आला तरी जनलोकपालचा मुद्दा अजूनही रखडलाच आहे. जनलोकपाल मंजूर न केल्यास 27 जानेवारीपासून जंतरमंतरवर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही बिन्नी यांनी यावेळी दिला. एवढे आरोप करूनही आपण पक्ष सोडणार नसल्याचं बिन्नी यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी स्पष्ट केलं. आपचे सदस्य योगेंद्र यादव यांनी बिन्नी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. बिन्नी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असं त्यांंनी जाहीर केलंय.

close