सुंदर हत्तीच्या बचावासाठी माधुरीही सरसावली

January 16, 2014 7:58 PM0 commentsViews: 1145

madhuri on hati16 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातल्या जोतिबा देवस्थानच्या सुंदर हत्तीचा छळ होत असल्याचं समोर आलं होतं. याच सुंदर हत्तीच्या संरक्षणासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित पुढं सरसावलीय. माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी या हत्तीला ‘पेटा’ पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स या संस्थेकडे सोपवावं, असं पत्र आमदार विनय कोरे यांना लिहिलं आहे.

सुंदर हत्तीची अवस्था बिकट झाली असून त्याला आता प्राणीसंग्रहालयाची गरज आहे. तो एकटा राहू शकत नाही तसंच त्याची जबाबदारी पेटा घ्यायला तयार आहे त्यामुळे त्याला बंदी न बनवता त्वरित पेटाकडे सोपवावे अशी मागणी माधुरीने केली आहे. सध्या हा हत्ती विनय कोरे यांच्या संस्थेच्या ताब्यात आहे. वारणानगरमध्ये असून त्याचा सांभाळ केला जात असल्याचं कोरेंनी स्पष्ट केलंय.

सुंदर हत्ती आमदार विनय कोरे यांनी जोतिबाला भेट दिला होता. गेल्यावर्षी येथे हत्तीला माहुताने मारहाण केल्याचा प्रकार ‘पेटा’ने उघड केला होता. तसंच हत्तीची देखभाल नीट केली जात नसल्याचंही समोर आलं होतं. पेटाने हा विषय उचलून धरला होता. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलही घेतली गेली. ब्रिटनचे संगीतकार पॉल मॅककार्टेनी आणि मॅडोना यांनी याचा निषेध केला होता. त्यानंतर कोरे यांनी हा हत्ती वारणेत हलवला होता. पेटाने सुंदरच्या मुक्तीसाठी ऑनलाइन पिटीशन दाखल केली होती. याला मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळाला होता. या हत्तीला मुक्त करण्याचे आदेश वनमंत्री पतंगराव कदम यांनीही दिले होते तरीही सुंदरची मुक्तता करण्यात आली नाही. अखेर हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. मात्र या वादात गेल्या सहा वर्षांपासून सुंदर हत्ती यातना भोगत आहे.

close