राहुल गांधींबद्दलचा निर्णय अंतिम -सोनिया गांधी

January 17, 2014 4:56 PM0 commentsViews: 614

Sonia Gandhi, Rahul Gandhi17 जानेवारी : राहुल गांधींबद्दल निर्णय काल झालाय आणि तो अंतिम आहे, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सोनिया गांधी बोलत होत्या.

यावेळी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करा अशा घोषणा युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. काल काँग्रेसच्या कार्यकारणीत राहुल गांधी यांची पक्षाचे प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड झालीय. मात्र राहुल यांची पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा अधिवेशनात करण्यात येणार नसल्याचे कार्यकारिणीत ठरवण्यात आलेय. या अधिवेशनाला सर्व काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांच्यासह देशभरातले नेते उपस्थित आहेत.

देशातला भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध आहे. लोकपाल विधेयक हे आमचे सर्वांत मोठे शस्त्र आहे. पुढील काही दिवसांत आम्ही आजून कडक भ्रष्टाचार विरोधक विधेयक आणणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

यूपीए आणि यूपीए 2 सरकारनं जनतेसाठी सर्वाधिक काम केल्याचा दावा ही सोनिया गांधींनी केला. आमच्या पक्षाने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याचं उत्पादन, विज्ञानातील प्रगती काँग्रेसच्याच कारकिर्दीत झाली. दलित, आदिवासींच्या मुलांना शिक्षणासाठी खास सवलत, सर्व शिक्षा अभियान आणि मध्यान्ह भोजन योजनाही सुरू केली. मनरेगामुळे ग्रामीण रोजगारात वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना या सगळ्या योजनांचा फायदा झाला आहे. देशातले सगळे महत्त्वाचे बदल आणि निर्णय काँग्रेसनंच घेतले आहेत, हे एका क्षणासाठीही विसरू नका असंही त्यानी सांगितलं.

सेक्युलरिझम हीच काँग्रेसची ओळख आहे. काँग्रेस आपल्या तत्त्वांवर कायम राहिल. काँग्रेस पक्ष येणार्‍या निवडणुकीसाठी तयार आहे. 2014 ची निवडणूक ही भारताची सेक्युलर परंपरा जपण्यासाठीची लढाई असेल असं सोनिया गांधी म्हणाल्या. काही शक्ती सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. धर्मनिरपेक्षता हीच काँग्रेसची खरी ओळख असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या मागणीसाठी अधिवेशनात जोरदार घोषणाबाजी झाली.

यावेळी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. दुपारी 3.30 वाजता माझ्या भाषणातून याबाबत बोलेनं असं त्यांनी सांगितलं.


close