रन मुंबई रन…

January 19, 2014 12:38 PM0 commentsViews: 173

marathon19 जानेवारी : यंदा मुंबई मॅरेथॉनचं 11वं वर्ष. एरवी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आज रविवारी सुट्टीच्या दिवशी उत्साहात रस्त्यावर धावायला उतरले होते. सामान्यातला सामान्य ते कोट्यधीश अशा सर्व स्तरांतील व्यक्ती यात सहभागी झाल्या होत्या. भारतीयांना या मॅरेथॉनचे जितके आकर्षण असते, त्याहून जास्त आकर्षण परदेशी धावपटूंना असते.

मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 किमीच्या फुल मॅरेथॉन प्रकारात पुरुष गटात केनियाचा इव्हान्स रुटो याचा प्रथम, लॉरेन्स किमायोचा दुसरा, तर फिलोमिन वारु याचा तिसरा क्रमांक आला. यावेळी भारतीय महिलांच्या मॅरेथॉनमध्ये मराठी महिलांनी वर्चस्व राखलं. यास्पर्धेत ललिता बाबर, विजयमाला पाटील आणि ज्योती गवाटे विजयी झाल्या. 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुष गटात इंद्रजीत पटेल, सोजी मॅथ्यू, मानसिंग हे विजेते ठरलेत, तर महिला गटात सुधा सिंग, कविता राऊत, किरण सहदेव या विजयी ठरल्यात.

आज सकाळी सुरू झालेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा मुख्य चार गटांत पार पडली. हौशी धावपटूंची पूर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन आणि ज्येष्ठ नागरिक अशा गटांचा यात समावेश होता.

दर वर्षीप्रमाणे हजारो धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहानं भाग घेतला. हौशी धावपटूंसाठी असलेली ऍमेच्यूअर मॅरेथॉन सीएसटीवरून सकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी व हाफ मॅरेथॉन वांद्रे येथून 6 वाजता सुरू झाली. अडीच किलोमीटरची अपंग मॅरेथॉनही झाली. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या चार किलोमीटर मॅरेथॉनमध्ये 92 वर्षांच्या एका आजोबांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या मॅरेथॉनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही सेलिब्रिटीजनी सहभाग घेतला. उद्योगपती अनिल अंबानी सहभागी झाले होते, तसंच जॉन अब्राहम, सुपर मॉडेल लिझा हेडन अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होते.

close