भाजपचं मिशन 2014!

January 19, 2014 3:54 PM0 commentsViews: 792

modicopy 19 जानेवारी :  काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानपदाचा उमेदवार मिळेल या आशेनं अधिवेशनाला आले होते, पण केवळ वाढीव सिलेंडर मिळण्याचं आश्‍वासन घेऊन घरी परतले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या नॅशनल कौन्सिलमध्ये बोचरी टीका केली. या वेळेस नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि भाजपच्या अधिवेशनाची तुलना करत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. काँग्रेस अधिवेशनात फक्त पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न तर भाजपच्या अधिवेशनात देशाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते यावेळेस म्हणाले.

काँग्रेस राजवटीत देशाची झाली तशी दुरवस्था यापूर्वी कधीच नव्हती. 2014 ची निवडणूक ही फक्त सत्तापरिवर्तनाची नाही, भारतीयांच्या आशा-आकांक्षा पणाला लागलेल्या आहेत, भारतीयांची स्वप्नं पणाला लागलेली आहेत, असं म्हणत त्यांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला.

मोदींनी आज गांधी घराण्यावरही तोफ डागली. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींना पंतप्रधान केलं तेव्हा कुठल्या परंपरेचं पालन केलं असा सवाल विचारत पराभव जेव्हा समोर दिसत असतो, तेव्हा कुठलीही आई मुलाला बळी चढवायला तयार होईल का, त्यामुळेच राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले नाहीय. काँग्रेसला पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर न करता पळवाट काढलीय, अशी टीकाही मोदी यांनी केली.

काही दिवसांपूर्वी मणिशंकर अय्यर यांच्या चहा विक्रेत्याच्या टीकेला मोदी प्रत्युत्तर देत म्हणाले, काँग्रेसवाले नामदार आहेत आणि मी कामगार आहे. पारंपरिक उच्चनीचता, वर्णभेद त्यांच्या मनात आहेत. म्हणूनच ‘चहावाला’या पदाची त्यांना सारखी आठवण येते. मोठ्या घराण्यात जन्मलेल्यांना मागास जातीत जन्मलेल्यांविरोधात लढणं अपमान वाटतो.

भारतात पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मिळून युती असावी आणि या युतीनं देशाच्या विकासासाठी काम करावं अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली. संसदीय लोकशाहीची मला चांगलीच ओळख आहे. अटलबिहारी पंतप्रधान असतानाही मी गुजरातचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार असतानाही मी सरकार चालवलंय. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समस्या मला चांगल्या प्रकारे समजतात. भाजपला सत्तेत आणल्यास पूर्वेकडच्या राज्यांचा नक्की विकास करू. बिहार, प.बंगाल, आसाम, मणिपूर, मेघालयच्या विकासाला आमचं प्राधान्य असेल. या राज्यांना कायम विकासापासून दूरच ठेवण्यात आलंय असल्याचंही ते म्हणाले.

65 टक्के तरुण आपल्या देशाची महत्त्वाची ताकद असणारा आहे. देशाला जुनीपुराणी विकासाची टेप रेकॉर्ड ऐकायचीय की विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड बघून मतदान करायचं ते तुम्हीच ठरवा. पूर्वी स्वराज्यासाठी देशातील तरुणांनी जीव दिला, आता सुराज्यासाठी मतदान करा, असे आवाहन मोदींनी तरुण मतदारांना दिले.

काँग्रेस म्हणते, ‘पैसे झाडावर उगवत नाहीत’. आम्ही म्हणतो, ‘धन-धान्य, पिकांमधूनच पैसा येतो’. कुटुंब, स्त्री, शेतकरी, युवा हे आमच्या कल्पनेतील इंद्रधनुष्याचे महत्त्वाचे रंग आहेत. विकासाच्या इंद्रधनुष्याची कल्पनाही मोदींनी मांडली.
महागाई रोखण्याचा काहीच उपाय कसा नाही, काँग्रेसकडे काम करण्याची इच्छाच नाहीय. देश तोडा आणि सत्ता करा ही काँग्रेसची नीती आहे, तर माणसं जोडा आणि राज्य करा ही आमची नीती आहे. त्यांना सत्ता कशी वाचवायची याचीच चिंता आहे तर आम्हाला मात्र देशाला वाचवायची चिंता लागून आहे.

अटलबिहारींनी देश जोडणारी सुवर्ण चतुष्कोण योजना राबवली. त्याचे पुढचे पाऊल म्हणून आम्ही हीरक चतुष्कोण योजना राबवू. देश 75 वर्षांचा होईल तेव्हा देशाच्या चारी दिशांना बुलेट ट्रेनने जोडू. अडवाणींनी काळ्या पैशाविरुद्ध लढाई सुरू केली आहे. सगळा काळा पैसा परत आणणार आणि महागाई कमी करणार असं आश्‍वासनही मोदींनी दिले.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे आमचे मिशन आहे. गर्भात मुलींना मारून टाकणं दुदैर्व आहे. स्त्री ही होममेकर नव्हे तर नेशन बिल्डर म्हणून तिच्याकडे बघण्याची वेळ आलीय असंही ते म्हणाले.

‘भारत’ या ब्रँडचं ब्रँंडिंग, प्रसिद्धी करणं गरजेचं आहे. दहशतवाद देशाला तोडतो, पर्यटन देशाला जोडतं, टेररिझम डिव्हाइड्स, दुरिझम युनाईट्स. जाता जाता मोदींनी माय आयडिया ऑफ इंडिया- सर्व पंथ समभाव! सर्वे भवनि सन्तू, सर्वे सन्तु निरामय: असं म्हणत पुन्हा एकदा व्होट फॉर इंडियाचा नारा दिला.

close