न्यूझीलंडची भारतावर 24 रन्सनी मात

January 19, 2014 2:38 PM0 commentsViews: 624

Match19 जानेवारी :  भारताच्या न्यूझीलंड दौर्‍याची सुरुवात निराशाजनक झाली आहे. नेपिअरमध्ये रंगणार्‍या पहिल्याच वन डेत न्यूझीलंडने वर्ल्ड नंबर वन असलेल्या टीम इंडियाला धूळ चारलीये. न्यूझीलंडने भारताचा 24 रन्सने पराभव केला. भारताने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पण भारताच्या बॉलर्सना चोप बसला. पहिली बॅटिंग करणार्‍या न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 293 रन्सचे आव्हान ठेवलं.

न्यूझीलंडची सुरुवात संथ झाली. त्यांचे दोन्ही ओपनर्स झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले पण त्यानंतर आलेल्या केन विलियमसन आणि रॉस टेलरने न्यूझीलंडची इनिंग सावरली आणि स्कोर वाढवला. विलियमसनने 71 रन्स केले तर टेलरनंही शानदार हाफ सेंच्युरी ठोकत 55 रन्स केले. त्यानंतर आलेल्या कोरी अँडरसननंसुद्धा फटकेबाजी सुरुच ठेवली. अँडरसनने 40 बॉल्समध्ये 4 खणखणीत सिक्स आणि 3 फोर ठोकत नॉटआऊट 68 रन्स केले. भारतातर्फे मोहम्मद शामीने सर्वोत्तम बॉलिंग करत 4 विकेट घेतल्या. पण इतर भारतीय बॉलर्स चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी झाले नाहीत.

भारताच्या इनिंगची सुरुवातही तितकीच खराब झाली. कारण एपनर रोहीत शर्मा फक्त 3 रन करुन पॅव्हेलियनमध्ये परतला पण तिसर्‍या नंबरवर आलेल्या विराट कोहलीने सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले. त्यानं 111 बॉल्समध्ये 11 फोर आणि 2 सिक्स ठोकत 123 रन्स केले. पण त्यानंतर कॅप्टन धोणी वगळता एकाही भारतीय बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. धोणीने 40 रन्स केलेत, तर मिचेल मॅकलेगनने 4 आणि कोरी अँडरसनने 2 विकेट घेत भारताच्या बॅटिंगला खिंडार पाडलं आणि अखेर न्यूझीलंडने भारताचा 24 रन्सचे पराभव करत पाच वन डेच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

close