राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी गुलदस्त्यात

January 21, 2014 9:32 PM0 commentsViews: 1205

sharad pawar4421 जानेवारी : काँग्रेसबरोबर जागावाटपाची चर्चा होण्याआगोदर लोकसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार नाहीत असं आता राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवारी) देवगिरी बंगल्यावर पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली.

माढा, सातारा, शिरूर, जळगाव, रावेर, बीड आणि कल्याण या 7 मतदार संघात कोणाला उमेदवारी द्यावी, यावर निर्णय झाला नाही. तर शरद पवारांबरोबर राज्यसभेवर दुसरा उमेदवार म्हणून कुणाला पाठवायचं, याबाबतचा निर्णय उद्या बुधवारी दिल्लीत होणार्‍या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत होईल, असं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलंय.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीने 14 उमेदवारांची यादी तयार केली असल्याचं जाहीर केलंय. पण उमेदवारीसाठी मंत्री एक पाऊल मागे घेत असल्यामुळे राष्ट्रवादीची पंचाईत झालीय. त्यातच काँग्रेसने उमेदवारांच्या यादीसाठी कोणतीही हालचाल केली नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीत 7 ते 8 जागांसाठी अजूनही तिढा कायम आहे. या जागा काँग्रेससोबत चर्चा करून अदलीबदली करून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय पण काँग्रेसने यादीच तयार केली नसल्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारींची यादी तुर्तास गुलदस्त्यात ठेवली आहे.

close