डॉ. श्रीकर परदेशींची अचानक बदली ?

January 22, 2014 9:19 AM0 commentsViews: 801

pardesi22 जानेवारी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांची अचानक बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडालीय. कुणीही आयुक्तांच्या बदलीची मागणी किंवा तक्रार केलेली नाही आणि आयुक्तांचा कार्यकाळ संपला नसतानाही बदली होत असेल तर ती अन्यायकारक आहे अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतलीय. ही संभाव्य बदली रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलनं केली जातायत.

आधी आप, मग मनसे आणि भाजपही या आंदोलनात उतरलंय. भाजपच्या एका शिष्टमंडळानं मंगळवारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणी केलीय. ही बदली थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना आपण पत्र लिहून विनंती करणार असल्याचं आश्वासन अण्णांनी त्यांना दिल्याचं भाजपचे कार्यकर्ते सांगतायत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर आयुक्त डॉ.

श्रीकर परदेशी यांनी कारवाई करू नये अशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका घेतली होती. मात्र आयुक्तांनी अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करून संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली होती. यामुळे अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच परदेशी यांची बदली केली जात असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. राष्ट्रवादीच्या महापौरांनीही आयुक्तांची बदली झाली तरी आम्हाला पर्वा नाही अशी भूमिका घेतलीय, त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध विरोधी पक्ष असा सामना या आंदोलनादरम्यान रंगणार आहे हे स्पष्ट झालंय.

close