‘आप’ला दोन नेत्यांचा ‘ताप’

January 22, 2014 6:50 PM0 commentsViews: 1068

somnath bharti kumar vishvash22 जानेवारी : आम आदमी पार्टी या ना त्या कारणाने चर्चेत कायम आहे. दिल्लीत धरणं आंदोलनानंतर आता ‘आप’च्या दोन नेत्यामुळे पक्षाच्या अडचणीत भर पडलाय. ‘आप’चे कुमार विश्वास आणि कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यामुळे ‘आप’ला अडचणीला सामोरं जावं लागत आहे. पण कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या पाठीशी पक्ष  भक्कमपणे उभा आहे.

सोमनाथ भारती आणि पोलिसांमधल्या वादानंतरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. युगांडाच्या महिलांचा छळ आणि विनयभंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय. त्यामध्ये सोमनाथ भारती यांचं नाव नाहीये, पण त्यातल्या एका महिलेनं सोमनाथ भारती यांना ओळखलंय.

मात्र पोलिसांना ‘आप’च्या समर्थकांकडून धमक्या येत असल्यामुळे ते भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला घाबरत आहेत, असा आरोप राष्ट्रीय महिला आयोगाने केलाय. त्यांना यापूर्वीच दिल्ली महिला आयोगानं समन्स बजावलंय. पण ते आयोगासमोर उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, युगांडाच्या महिलेनं साकेत महानगर दंडाधिकार्‍यांसमोर जबाब नोंदवलाय. तर भारती यांनी आपली बाजू मांडली असून महानगर दंडाधिकारी त्यावर समाधानी आहेत, असं ‘आप’कडून सांगण्यात येतंय.

कुमार विश्वास यांचा माफीनामा

तर दुसरीकडे, ‘आप’चे नेते कुमार विश्वास यांनी केरळमधल्या नर्सेसबद्दल काढलेल्या उद्गांरांबद्दल इमेलवरून माफी मागितलीये. 2008मधला एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता, त्यामध्ये विश्वास या नर्सेसच्या रंगांवरुन टिपण्णी करत असल्याचं दिसलं होतं, त्यावरून वाद निर्माण झाला होता. केरळमधल्या ‘आप’च्या ऑफिसवर हल्ला झाला होता, तर दिल्लीमध्ये नर्सेसनं आंदोलन केलं होतं. आपल्या टिपण्णीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी खेद व्यक्त करतो, माझा हेतू तसा नव्हता असं विश्वास यांनी म्हटलंय. विश्वास यांनी माफी मागितली असली तरी दिल्लीतल्या केरळ भवनाबाहेर केरळ नर्स असोसिएशन विश्वास यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत.

कुमार विश्वास यांनी पाठवलेल्या ई-मेलमध्ये काय म्हटलंय?

“मला असं कळलं आहे की, माझ्या एका जुन्या कवी संमेलनाच्या व्हिडिओ क्लीपमुळे केरळमधल्या माझ्या मित्रांच्या भावना दुखावल्या आहेत. धर्म, स्थान, लिंग, जात किंवा वर्णाच्या आधारे भेदभाव मला अजिबात मान्य नाही. मी जाणीवपूर्वक कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाही.” – कुमार विश्वास

close