कसाबसह 35 जणांवर चार्जशीट दाखल

February 25, 2009 11:46 AM0 commentsViews: 5

25 फेब्रुवारी मुंबईअमेय तिरोडकर मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाबसह कसाबसह 35 जणांवर चार्जशीट दाखल झाली. मुंबईतल्या किला कोर्टात ही कार्यवाही झाली. कसाबला 27 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू झाला. मुंबई पोलिसांनी तयार केलेलं हे चार्जशीट एक हजार पानांचं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव कसाबला कोर्टात आणण्यात आलं नव्हतं. मात्र, फहीम अन्सारी आणि सबाउद्दीनला कोर्टात हजर करण्यात आलं. या दोघांवरचे खटले या चार्जशीटमध्ये एकत्र करण्यात आलेत. या दोघांना 19 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. स्कोडा घेऊन पळालेला कसाब आणि त्याच्या साथीदाराची, गिरगाव चौपाटी इथं पोलिसांशी झटापट झाली. कसाबवर झडप घालणा-या तुकाराम ओंबळेंचा यात बळी गेला, पण इतर अधिका-यांनी कसाबला पकडलंच.आणि इथूनच सुरू झाला 26 नोव्हेंबर हल्ल्याचा तपास. दहशतवादी हल्ल्यात पहिल्यांदाचं कसाबसारखा दहशतवादी सापडला होता. मग पोलिसांची व्यूहरचना सुरू झाली. दहा दहशतवाद्यांपैकी ताज हॉटेलमध्ये चौघं, ओबेराय हॉटेलमध्य दोघं, नरिमन हॉऊस इथं दोघं तर सीएसटी स्टेशन इथं कसाब आणि त्याचा साथीदार होता. ही सर्व माहिती कसाबनं दिली. कसाब आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात 12 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यात सीएसटी स्टेशनमधील हल्ला, कामा हॉस्पिटल इथला हल्ला, रंगभवन इथला हल्ला, मेट्रो इथला हल्ला, स्कोडा गाडीचा दरोडा, गिरगांव इथला हल्ला, हॉटेल ओबेरायमधील हल्ला, नरिमन हाऊसमधील हल्ला ताज हॉटेलमधील हल्ला, माझगाव येथील टॅक्सीतला बॉम्बस्फोट, विलेपार्ले येथील टॅक्सीतील बॉम्बस्फोट आणि कुबेर बोटीचा तांडेल अमरसिंग सोलंकीची हत्या हे ते बारा गुन्हे आहेत. या आरोपपत्रात सबाउद्दीन आणि फईम अन्सारी हे देखील आरोपी आहेत . त्यांच्यावर कसाब आणि त्याच्या साथीदारांवरच्या आरोपांबरोबरच, त्यांना मदत केल्याचाही आरोप आहे, शिवाय या आरोपपत्रात काही व्यक्तींना फरारी दाखवण्यात आलंय आणि हे फरार आरोपी पाकिस्तानात असल्याचं म्हटलंय.

close