भगवा फडकवणारच, शिवसैनिकांनी घेतली शपथ

January 23, 2014 6:16 PM0 commentsViews: 2588

udhav thakare on 26 jan23 जानेवारी : “मी,माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की..” खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात हजारोंच्या संख्येनं जमलेल्या शिवसैनिकांनी येणार्‍या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवर खाली खेचणार आणि भगवा फडकवणार अशी शपथ घेतलीय.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांनी आज (गुरुवारी) मुंबईतील सोमय्या मैदानावर शिवबंधनाची प्रतिज्ञा केलीय. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. देशाचा पंतप्रधान हा कमजोर असून त्यांना काँग्रेसमध्ये काहीही किंमत नाही अशी बोचरी टीका उद्धव यांनी केली. तसंच लोकसभाच काय विधानसभा निवडणुकाही होऊ द्या, निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी उरणार नाही असंही उद्धव म्हणाले. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करु अशी प्रतिज्ञा उद्धव यांनी शिवसैनिकांना दिली.

26 जानेवारीला पंतप्रधानांचं लालकिल्यावरुन शेवटचं भाषण -उद्धव ठाकरे

आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त शिवबंधनाची शपथ घेण्यासाठी सोमय्या मैदान शिवसैनिकांनी तुडुंब भरले होते. आपल्या सैनिकांना संबोधण्यासाठी उद्धव ठाकरे उभे राहिले पण ज्या काँग्रेसच्या पंतप्रधानांवर उद्धव यांनी तोफ डागली तोच गोळा फुसका निघाला. उद्धव म्हणलतात, तुम्हाला माहित आहे का, आज 23 जानेवारी आणि दोन दिवसांनी 26 जानेवारी आहे. 26 जानेवारीचं वैशिष्टय काय आहे, माहित आहे का तुम्हाला ? तर येत्या 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी काँग्रेसचा शेवटचा पंतप्रधान लालकिल्यावरुन भाषण करणार आहे. त्यांच्यानंतर कधीच काँग्रेसचा पंतप्रधान लालकिल्यावरुन बोलणार नाही ही काळा दगडावरची भगवी रेघ आहे अशी अजब टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली खरी पण त्यांची टीका सपेशल खोटी ठरलीय. कारण, प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन भाषण करत नाही तर 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी भाषण करत असतात. याचा उद्धव ठाकरेंना विसर पडला असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काढला. त्यामुळे चौफेर तोफ डागण्यासाठी उभे राहिलेले उद्धव ठाकरे यांनी चुकीच्या माहितीच्या गोळा आपल्याच पायावर पाडून घेतला आहे.

काँग्रेस पुन्हा सत्तेत आलं तर अराजक माजेल !

उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये शिवसैनिकांना एकनिष्ठतेची शपथ दिली. आम्ही हिंदू आहोत हे सांगणं गुन्हा आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिला. ही राजकीय सभा नाही असं उद्धव ठाकरेंनी सुरूवातीला जाहीर केलं खरं…पण पंतप्रधान मनमोहन सिंग, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व राजकीय मुद्यांवर ते बोलले. मनमोहन सिंग हे आतापर्यंतचे सगळ्यांत दुबळे पंतप्रधान आहेत, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस पुन्हा सत्तेत आलं तर अराजक माजेल, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. निरपराध लोकांना सोडून द्या, त्यासाठी धर्म पाहू नका, असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रावर टीका केली. तर पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार शून्य असल्याचंही ते म्हणालेत. पुढचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही युतीचाच असेल, असा दावाही उद्धव यांनी केला. शिवसैनिकांच्या शक्तीचा दुरूपयोग करणार नाही, असा विश्वासही उद्धवनी शिवसैनिकांना दिला. या सभेत बाळासाहेब ठाकरे IAS ऍकेडमीचं तसंच मातोश्री महिला बचत गट महासंघाचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच महिला आणि तरूणींच्या सुरक्षिततेसाठी ऍपचं उद्घाटनही करण्यात आलं.

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

तुम्ही सगळे जण (शिवसैनिक) कलानगरमध्ये मातोश्रीवर यायचे. बाहेर जमून ‘बाळासाहेब-बाळासाहेब दर्शन द्या’ अशी हाक द्यायचे. बाळासाहेब कितीही थकले असले तरी तुमचा आवाज ऐकून, ‘येतो बाबा येतो’ म्हणून खिडकीतून सर्वांना अभिवादन करायचे. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिक हे माझे टॉनिक आहे. बाळासाहेबांनी रोवलेलं बीज आज कल्पवृक्षात रुपांतरीत झालंय. ही ताकद माझी नसून बाळासाहेबांची ताकद आहे.

बाळासाहेबांनी दिली शपथ
 
“मी,माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की, मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन. पद असो, वा नसो मी एक, मी एक निष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेईमानी करणार नाही. शिवसेनाप्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेनं पाळीन. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचं जे स्वप्न आहे ते निष्ठेनं शपथपूर्वक पूर्ण करीन.”

उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिज्ञा

मी, प्रिय बाळासाहेबांना स्मरुन प्रतिज्ञा करतो की, महाराष्ट्राची प्रतिष्ठा आणि मराठी माणसाठी अस्मिता यासाठी सदैव जागता राहीन. शिवरायांच्या भगव्या झेंड्याची शान राखीन. त्याला कलंक लागेल असे कधीही वागणार नाही. मी धगधगत्या निखार्‍यासारखं जगेन. माझ्यावर कधीही राख साचू देणार नाही. प्रखर हिंदूत्वाची काष्ट मी सोडणार नाही. भारतमातेच्या सौभग्याच्या रक्षणासाठी मराठीबाणा दाखवेन. देशावर हिरवे संकट येऊ देणार नाही. मी,महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांना शपथ देऊन प्रतिज्ञा करतो की, महाराष्ट्रातून मस्तवाल, सत्ताधुंद काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचेल महाराष्ट्रात शिवशाहीचे राज्य आणेल. गोरगरीब जनता,शेतकरी आणि माता-भगिनीच्या आयुष्यात सुखा समाधनाचे क्षण आणून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करीन.

close