केजरीवाल येड्यांच्या जत्रेचा म्होरक्या : शिवसेना

January 24, 2014 3:08 PM0 commentsViews: 1429

sammana 3424 जानेवारी : दिल्लीत पोलिसांच्या विरोधात धरणं आंदोलन केल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर चोहीबाजून टीका होत आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापाठोपाठ शिवसेनेनंही आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची संभावना वेडा अशी केलीय.

शिवसेनेनं आपल्या मुखपत्र सामना दैनिकातून अरविंद केजरीवाल यांच्यावरचा हल्ला कायम ठेवला आहे. एक येडयांची जत्रा देशाच्या राजकारणात उदयाला आली असून अरविंद केजरीवाल नामक येडा या जत्रेचा म्होरक्या आहे, अशी खरमरीत टीका सेनेच्या मुखपत्रात करण्यात आलीय. केजरीवाल यांनी शिंदेंचा उल्लेख एकेरी आणि अरेतुरेच्या भाषेत केला ही कोणती संस्कृती असा प्रश्नही शिवसेनेनं विचारलाय.

प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी ‘आप’ हा पक्ष ‘आयटम गर्ल’ आहे अशी टीका केली होती. चेतन भगत यांच्या टीकेचा धागा पकडून शिवसेनेनं आपल्या शैलीत आप पक्षावर आसुड ओढलाय. केजरीवाल यांचापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते व जे लोक राखी सावंत हिची आयटम गर्ल म्हणून हेटाळणी करतात आता त्यांनी राखीचा सन्मान केला पाहिजे. कारण केजरीवाल आणि त्यांचा आप सगळ्यात बदनाम ‘आयटम गर्ल’ बनला आहे अशी टीका शिवसेनेनं केलीय.

सामनातून टीका

“एक येड्यांची जत्रा देशाच्या राजकारणात उदयाला आली असून अरविंद केजरीवाल नामक ‘येडा’ या जत्रेचा म्होरक्या आहे. केजरीवाल यांची हीच ‘आप’ संस्कृती असेल तर त्यांना देशात अराजक निर्माण करायचे आहे व त्यामागे देशविघातक शक्ती आहेत, हे मान्य करावेच लागेल. गृहमंत्री शिंदे यांचा उल्लेख केजरीवाल महाशयांनी एकेरी व अरेतुरेच्या भाषेत केला. ही कोणती संस्कृती? केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते. केजरीवाल व त्यांचा ‘आप’ सगळ्यात बदनाम ‘आयटम गर्ल’ बनला आहे.”

close