धागे बांधून कुणी-कुणाच्या बंधनात अडकत नसतं -राज ठाकरे

January 24, 2014 4:22 PM1 commentViews: 6539

Image udhav_on_raj_534523_300x255.jpg23 जानेवारी : ‘धागे बांधून कुणी-कुणाच्या बंधनात अडकत नसतं’ त्यापेक्षा युवकांच्या जवळ जा आणि लोकांचे प्रश्न समजून घ्या असा सल्लावजा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावलाय.मुंबईत मनसेच्या नगरसेवकांच्या बैठका सुरू आहे यावेळी राज यांनी शिवसेनेच्या शिवबंधन कार्यक्रमाचं तोंडसुख घेत टोला लगावला.

गुरुवारी सोमय्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लाखो शिवसैनिकांनी शिवबंधनाचा धागा बांधला. यावेळी बाळासाहेबांची जुनी ध्वनीफिती ऐकवण्यात आली. बाळासाहेबांनी या अगोदर शिवसैनिकांना पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याची आणि निवडणुकीत भगवा फडकवण्याची शपथ दिली होती. तीच शपथ पुन्हा देण्यात आली. त्यानंतर उद्धव यांनी बाळासाहेबांचं स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञा दिली. शिवसेनेचा हा कार्यक्रम संपत नाही तेच राष्ट्रवादीने टीकास्त्र सोडले होते. राज्यात जादूटोणा कायदा लागू झाल्यामुळे धागेदोरे बांधून काही होणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या टीकेनंतर आता मनसेनंही टोला लगावलाय.

आज शुक्रवारी सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत राज यांनी धागे बांधून कुणी-कुणाच्या बंधनात अडकत नसतं असा टोला सेनेला लगावला. त्यापेक्षा तरुणांच्या जवळ जा त्यांच्या समस्या समजून घ्या, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या आणि कामाला लागा असा सल्ला राज यांनी दिला. या बैठकीत नवीन उपाययोजना आणि आगामी विकासकामांसंदर्भात चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आता कंबर कसलीय. राज यांनी नाशिक दौरा आटोपून आल्यानंतर बैठकींचा धडाका लावलाय. या बैठकीत नगरसेवकांपासून ते आमदारांपर्यंत सगळ्यांची कानउघडणी केली जात आहे.

  • umesh jamsandekar

    परीक्षा घेवून आपण काय केल याचा विचार केलात तर दुसऱ्यांची बंधन आपल्याला दिसणार नाहीत.

close