65वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

January 26, 2014 2:15 PM0 commentsViews: 331

india26 जानेवारी :  65वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा होतोय. मुख्य सोहळा देशाची राजधानी नवी दिल्लीत झाला. जपानचे पंतप्रधान शिंझो एब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्रीमंडळातले सदस्य आणि इतर अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते.

आजच्या सोहळयाचे प्रमुख पाहुणे होते जपानचे पंतप्रधान शिंझो एब. भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासह राजपथावर त्यांचं विशेष गाडीतून आगमन झालं. त्यापूर्वी त्यांच्या पत्नी नोबुओ किशी यांचं आगमन झालं. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दोघांचंही स्वागत केलं. सुरवातील पंतप्रधान, राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्यप्रमुखांनी इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीवर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. देशाच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावणार्‍या वीर जवानांची आठवण सैदेव तेवत ठेवणार्‍या या अमर जवान ज्योतीचे अनोखे महत्त्व आहे.

भारताच्या लष्कराचं सामर्थ्य
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताच्या लष्कराचंही सामर्थ्य दिसून आले. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या तेजस या हलक्या लढाऊ विमानासह इतर शस्त्रास्त्रांचंही दर्शन राजपथावरच्या संचलनात झाले. यामुळे भारतीयांच्या मनात एकाचवेळी स्वत:च्या संरक्षण दलाबद्दल विश्वास आणि अभिमान अशा दोन्ही भावना दाटून आल्या तर त्यात काहीच नवल नाही.

चित्ररथांतून संस्कृतीचं दर्शन
भारताच्या विविधतेत एकता आहे, हे दरवर्षी संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून दिसून येतं. यावेळी भारताच्या वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडते. यंदा महाराष्ट्राने कोळी संस्कृती सादर केली. त्याला उपस्थितांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. विविध राज्य आणि मंत्रालयांमार्फत एकूण 18 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशचा वाराणसीचा सूर्योदय, उत्तराखंडाचा संजीवनी बूटी, जम्मू आणि काश्मीरचा भटकी संस्कृती, राजस्थानचा तेरा थाली असे वेगवेगळे चित्ररथ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

close