काँग्रेसचे हुसेन दलवाई आणि मुरली देवरा राज्यसभेच्या रिंगणात

January 27, 2014 12:57 PM0 commentsViews: 468

dalwai, devra27 जानेवारी : राज्यसभेसाठी काँग्रेसने पुन्हा हुसेन दलवाई आणि मुरली देवरा यांच्यावर विश्वास टाकलाय. काँग्रेसने काल दिल्लीत या दोघांचीही उमेदवारी जाहीर केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी राज्यसभेवर गेलेल्या हुसेन दलवाईंना अडीच वर्षांचाच कालावधी मिळाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात येतेय. तर मुरली देवरा यांनी मात्र आपले पूर्ण कसब पणाला लावत उमेदवारी पुन्हा खेचून आणली आहे. देवरा आणि दलवाई आज विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज भरला आहे.

याआधी, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार शरद पवार आणि माजिद मेमन यांनी अर्ज भरलेत. तसंच शिवसेनेकडून राजकुमार धूत यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरलाय तर अपक्ष उमेदवार म्हणून संजय काकडे हेही रिंगणात आहेत. दरम्यान, भाजपनं रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित केली असली तरी अधिकृत घोषणा अजून व्हायचीय.

आता प्रश्न उरतोय तो मनोहर जोशींचा. शिवसेना जोशी सरांना दुसरा उमेदवार म्हणून उभं करतं का, की स्वत: जोशी सर अपक्ष म्हणून अर्ज भरतात हे गुलदस्त्यातच आहे. एकूणच काय तर खरी चुरस आहे ती सातव्या जागेसाठी. या जागेसाठी संजय काकडे यांच्याविरोधात शेवटपर्यंत उमेदवार रिंगणात आला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होण्यााचीही शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी असल्याने मंगळवारी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यसभा निवडणूकचे निश्चित उमेदवार

  • काँग्रेस- मुरली देवरा, हुसेन दलवाई
  • राष्ट्रवादी- शरद पवार, माजिद मेमन
  • शिवसेना- राजकुमार धूत
  • भाजप- रामदास आठवले (निर्णय अद्याप जाहीर नाही )
  • अपक्ष- संजय काकडे

close