टोल’फोड’ खपवून घेणार नाही -अजित पवार

January 27, 2014 5:31 PM0 commentsViews: 2938

ajit pawar abad sot27 जानेवारी : फोडाफोडी- तोडाफोडीचं राजकारण अजिबात खपवून घेणार नाही, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणार्‍यांची अजिबात गय केली जाणार नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेला दिलाय.

तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खुशाल सांगता टोल भरु नका, तुम्हाला अडवलं तर तोडफोड करा ही संस्कृती पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात खपवून घेणार नाही. जे कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.

लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊ ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली. त्यात मनसेनं आपल्या स्टाईलने वेगळीच सुरुवात केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशी इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यात टोल भरु नका, जर कुठे अडवलं तर त्याला तुडवा असे आदेशच राज यांनी दिली. राज यांचं भाषण संपून काही तास उलटत नाही तेच राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर हल्लाबोल केला.

आज सोमवारी सकाळपासून राज्यभरात टोल नाक्याची तोडफोड केली जात आहे. मनसेच्या या राड्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीने समाचार घेतलाय. अगोदर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेनं टोल नाक्याचा प्रश्न उचलून धरल्यामुळे कुरघोडी करण्यासाठी मनसेनं टोलफोड सुरू केली आहे असा आरोप मलिक यांनी केलाय. तर चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलीय. आता या टोल युद्धात अजित पवार यांनीही उडी घेतली. फोडाफोडीचं आणि तोडाफोडीचं राजकारण अजिबात सहन केलं जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.

कुठल्याही पक्षानं कायदा हातात घेतला तर त्यांची गय केली जाणार नाही, राज ठाकरे खुशाल सांगता टोल भरु नका, तुम्हाला अडवलं तर तोडफोड करा ही संस्कृती पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात खपवून घेणार नाही. जे कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. तसंच टोल बंद करणं परवडणारं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही कुणाच्याही आंदेालनामुळे टोल बंद होणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या टोलबाबतच्या चिथावणीखोर वक्तव्याची गृहमंत्रालयानं दखल घेतलीय. राज ठाकरेंचं भाषण तपासण्याचे आदेश गृह खात्याने कायदा मंत्रालयाला दिले आहे.

close