प. बा. सामंत यांचं निधन

February 26, 2009 12:58 PM0 commentsViews: 17

26 फेब्रुवारी, मुंबईज्येष्ठ समाजवादी नेते प.बा.सामंत यांचं निधन झालंय. ते 86 वर्षांचे होते. मुंबईत गोरेगाव इथंल्या घरी त्यांचं निधन झालं.1948 सालापासून ते समाजवादी चळवळीत सक्रीय होते. जनता पक्षातर्फे ते आमदार ही होते. आणिबाणीच्या विरोधात त्यांनी लढा दिला होता. आणिबाणीविरोधात त्यांनी केंद्र सरकारविरोधात खटलाही दाखल केला होता. 1980 साली तत्कालीन मुख्यमंत्री अ र अंतुलेंच्या सिमेंट घोटाळ्याविरोधातही त्यांनी न्यायालयीन लढाई लढवली. स्वत:ची गोरेगाव इथली जमीन त्यांनी सामाजिक कार्यासाठी दिली होती. मुंबईत नागरी निवारा परिषद स्थापण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळं मुंबईत स्वस्त घरांची एक मोठी योजना साकार झाली. केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे अनेक सामाजिक कामं करण्यात त्यांचा पुढाकार होता. अखेर पर्यंत सामान्यांच्या प्रश्नासाठी ते लढले.त्यांच्याविषयी ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे गतकाळात रमून गेल्या. मृणाल गोरे सांगतात, "आम्ही 60 वर्षं बरोबर काम केलं आहे. ते तेव्हा गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यावेळी गोरेगावात झाडू काम करणा-या कामगारांना घर हवीत म्हणून त्यांनी स्वत:ची जमीन देऊ केली. समाजपयोगी काम करत असताना त्यांनी कधीही स्वत:चा फायदा केला नाही. मुंबईत राहून राबणा-या लोकांना स्वत:च्या हक्कांची घरं मिळावीत यासाठीचा हा नागरी निवारा प्रकल्प होता. नागरी निवारा प्रकल्पामध्ये आम्हाला बाबुरावांची खूपच मदत झाली. बाबूरावांची सर्व शक्ती ही ध्येयवादासाठी खर्च झाली. घरची उत्तम परिस्थिती, घरचा बांधकामाचा व्यवसाय असूनही ते समान्य माणसासाठी बिल्डरच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. " बाबूरावांनी 1980 साली तत्कालीन मुख्यमंत्री अ.र अंतुलेंचा उघडीकस आणलेला सिमेंट घोटाळा भरपूर गाजला होता. त्याविषयी बाबूरावांचे सहाकारी समाजवादी नेते भाई वैद्य सांगतात, " मुख्यमंत्री अ. र.अंतुलेंच्या विरोधातला घोटाळा उघडकीस आणण्याचं श्रेय बाबूराव सामंतांना जातं. बाबूरावांचा कायद्याचा अभ्यासही चांगला होता. आणिबाणीच्या विरोधात लढण्यासाठी बाबूरावांचा हा कायद्याचा अभ्यास चांगलाच उपयोगी पडला. आणिबाणीच्या काळात त्यांनी केसेसही लढवल्या आहेत. "

close