शिक्षक निघाले पुन्हा सुट्टीवर !

January 28, 2014 4:26 PM0 commentsViews: 330

356 techers28 जानेवारी : राज्यातील प्राथमिक शिक्षक अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा तीन दिवस सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नुकतंच महाबळेश्वरमध्ये शिक्षकांचं अधिवेशन झालं. त्यासाठीही शिक्षक सुट्टीवर होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये 2 तारखेला शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी चर्चासत्र आणि शिक्षकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

2 तारखेला कोल्हापूर इथे या परिषदेला सुरुवात होईल. दोन तारखेला चर्चासत्र तर तीन तारखेला शिक्षकांचा मेळावा होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण यासाठी राज्यभरातून अधिवेशनाला जाणार्‍या शिक्षकांना 2 दिवसांची ऑन ड्युटी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.

2 तारखेला रविवार आहे. तो दिवस वगळून ग्रामविकास खात्याने शिक्षकांना 3 आणि 4 तारखेला ऑन ड्युटी सुट्टी मंजूर केलीये. यामुळे हे दोनही दिवस शिक्षकांविना किंवा उपलब्ध असलेल्या शिक्षकांच्या जिवावर शाळा चालवण्याची वेळ शाळांवर येणार आहे. पहिली ते सहावीपर्यंत इयत्ता शिकवणारे साधारण 1 लाख शिक्षक अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण यामुळे होणार्‍या परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडणार आहे त्याचं काय याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाहीये.

close