मुंबई पालिकेचा भूखंड बिल्डराच्या घश्यात !

January 29, 2014 4:51 PM0 commentsViews: 388

navi mumbai palika news 342शैलेश तवटे, नवीमुंबई

29 जानेवारी : नवीमुंबई महापालिकेचं मुख्यालय उभारण्यासाठी सिडकोने वाशीतले दोन भूखंड पालिकेला दिले होते. पण पालिकेने हे भूखंड सर्व नियम धाब्यावर बसवून खाजगी बिल्डरला विकल्याचं उघड झाालंय.

नवी मुंबईच्या वाशीमध्ये पामबीच मार्गावर उभी असलेली गगनचुंबी इमारत…सतरा प्लाझा…ज्या भुखंडावर ही इमारत उभी आहे, तो भूखंड 2001 साली सिडकोने पालिकेला पालिका मुख्यालय बांधण्याच्या अटीवर 18 कोटी 28 लाख रुपयांना दिला. एकूण 14 हजार 995 स्क्वे.मी. एवढा भूखंड देण्यात आला. पण 2005 साली हाच भूखंड पालिकेनं सतरा प्रॉपर्टीज इंडिया प्रा. लिमिटेडला 61 कोटी 59 लाख रुपयांना विकला. त्यासाठी सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले आणि निविदाही काढण्यात आली नाही. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते विजय माने यांनी केलाय.

मुख्य म्हणजे या इमारतीच्या सी सी प्रमाणपत्रासाठी सिडकोने अजूनपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही. या संदर्भात सिडकोचे अधिकारी एल. जी. पलुस्कर विचारलं असता त्यांनी बोलायला टाळाटाळ केली. आमच्याकडे त्यासाठी स्वतंत्र संस्था आहे, स्वतंत्र अधिकारी आहे. ते तपासणार कुणाचं खरंच काही नुकसान झालंय का. ती ही पब्लिक अथॉरिटी आहे, आम्हीही पब्लिक अथॉरिटी आहोत. त्यामुळे इकडचं तिकडे दिलं काय किंवा तिकडचं इकडे दिलं काय, दोन्ही पब्लिककडेच राहणार अशी उडावउडवीची उत्तर दिली.

तर याच एनओसी शिवाय पालिकेनं बांधकामाची सीसी कशी काय दिली हा प्रश्न आहे. याप्रकरणी अधिकार्‍यांवर कारवाई करा असं विरोधकांचं म्हणणं आहे. नवी मुंबई महापालिकेच्या भुखंडांच्या घोटाळ्याचं हे पहिलंच प्रकरण नाहीये. याआधीही प्रस्थापितांच्या विरोधातील ग्लास हाऊस सारखी प्रकरण उजेडात आली आहेत. आता हळूहळू हा भ्रष्टाचार तर उघडकीला येतोय. प्रश्न आहे तो दोषींवरच्या कारवाईचा…

भूखंडाचं श्रीखंड

  • एकूण भूखंड- 14 हजार 995 स्क्वे.मी
  • 2001 – सिडकोने पालिकेला 18 कोटी 28 लाखांना भूखंड विकला
  • 2005- पालिकेने सतरा प्रॉपर्टीज इंडिया प्रॉपर्टीज प्रा. लिमिटेडला 61 कोटी 59 लाखांना विकला

close