राज ठाकरेंवर कारवाई कधी ?

January 29, 2014 6:46 PM1 commentViews: 1376

2352 raj on toll29 जानेवारी : राज्यात कुठेही टोल भरायचा नाही, जर कुणी अडवलं तर तुडवा असा आदेश देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यात गुन्हे तर दाखल झाले आहेत. पण राज ठाकरेंवर कधी आणि काय कारवाई करणार, याबाबत मात्र बोलायला पोलीस तयार नाहीत.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार की, नाही याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुणे दौर्‍यावर येत आहेत. यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरूच आहे आज (बुधवारी) पुणे-सातारा रोडवरील रिलायन्स इन्फ्रास्टक्चर ऑफिस तोडफोड प्रकरणी मनसेच्या 7 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय.

मागील रविवारी वाशी इथं मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांना टोल ‘तुडवा’ असे आदेश दिले होते. राज यांनी आदेश दिल्यानंतर काही तासातच मनसेसैनिकांनी टोल नाक्यांवर हल्लाबोल केला. ठाण्यापासून टोल फोडीला झालेली सुरुवात सोमवारी राज्यभर पसरली.

मुंबई,पुणे,नाशिक, परभणी, औरंगाबाद, नागपूरमध्ये मनसेसैनिकांनी टोल नाक्यांची मोठी तोडफोड केली. यावेळी मनसेच्या आमदारांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं पण ‘टोल’फोड सुरूच राहिली. मंगळवारी पुण्यात राजगड आणि लोणी काळभोर इथं कलम 109, 143, 147 नुसार गुन्हे दाखल झाले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही टोल नाक्यांची तोडफोड प्रकरणी योग्य कारवाई करू असा इशारा दिला होता. पण अजूनही कुणावर कारवाई झाली नाही. आता 30 जानेवारी रोजी राज ठाकरे पुणे दौर्‍यावर निघणार आहे त्यामुळे पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

  • ketan

    राज ठाकरेंवर कारवाई करणार मग बेकायदा टोल वसूल करणाऱ्यावर कारवाई कधी ?