राष्ट्रवादीत अस्वस्थता, काँग्रेसची ‘हाताची घडी’

January 31, 2014 6:53 PM0 commentsViews: 1405

pawar and cm53423431 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसवर दबाव वाढवलाय. जागावाटपाबाबत काँग्रेस निर्णय घ्यायला उशीर करतंय ही खेदजनक आहे. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि केंद्रातले नेते वेगवेगळी भाषा बोलत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्हाला काँग्रेसशी युती हवीय, पण काँग्रेसनं लवकरात लवकर जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा, असं पटेल यांनी म्हटलं आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी उमेदवाराची यादीही तयार केलीय. पण या यादीत 7 ते 8 जणांचा घोळ कायम आहे. या सात ते आठ जागांचा घोळ मिटवण्यासाठी काही मतदारसंघातील जागा अदलीबदली करुन घ्यायच्या आहे. पण काँग्रेसने यादीच तयार न केल्यामुळे राष्ट्रवादीची पंचाईत झालीय. त्यामुळे काँग्रेसने यादी जाहीर केल्यावरच उमेदवारांची यादी जाहीर करू अशी भूमिका घेतलीय. काँग्रेस काही हालचाल करत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दबाव टाकण्यास सुरूवात केलीय.

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींची बाजू घेतली होती. राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2002 च्या दंगलीप्रकरणी राहुल यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पण यूपीएचा मित्रपक्ष राष्ट्रवादीने मोदींची बाजू घेतली होती. आज प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला थेट इशाराच दिलाय. हे होत नाही तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण नरेंद्र मोदींशी आपली भेट झालेली नाही, , ही बातमी, पूर्णपणे खोडसाळ, आधारहिन आणि चुकीची आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.एकंदरीतच चार राज्यात झालेल्या काँग्रेसचा पराभव आणि निवडणुकीचे सर्व्हे भाजपच्या बाजूने असल्यामुळे वेगळेचे वारे वाहू लागले आहे.

close