हंसराज अहिर यांचं प्रगतीपुस्तक

January 31, 2014 10:43 PM0 commentsViews: 184

महेश तिवारी, चंद्रपूर

31 जानेवारी : लेखाजोखा खासदारांमध्ये आज चंद्रपूरचे भाजपचे खासदार हंसराज अहिर. केंद्र सरकारच्या कोळसा घोटाळ्यामुळे चर्चेत आले ते चंद्रपूरचे भाजपचे खासदार हंसराज अहिर. अहिरांनी तब्बल तीन वेळा चंद्रपूरचं संसदेत प्रतिनिधित्व केलं. पण इथल्या कामगारांच्या, आदिवासींच्या काळ्याकुट्ट जगण्यात भाकरीचा चंद्र काही ते देऊ शकले नाहीत.

भाजपचा ओबीसी चेहरा म्हणजे चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर. गेल्या 15 वर्षांपासून ते चंद्रपूरचं दिल्लीत नेतृत्व करत आहेत. यंदा तर देशभर गाजलेल्या कोळसा घोटाळ्यामुळे ते चर्चेत आले. चंद्रपूर म्हणजे काळ्या सोन्याचं शहर. इथं कोळशाच्या तब्बल 50 खाणी आहेत. कोळसा खाणींमध्ये गेलेल्या जमिनींना जास्तीत जास्त मोबदला मिळवून दिल्याचं श्रेय ते घेतात.

अर्थात यासाठी खासदारांचे प्रयत्न असले तरी याचं श्रेय काँग्रेसकडे जात असल्याचं विरोधक मानतात. संसदेत 100 टक्के उपस्थितीचा पुरस्कार अहिरांनी पटकवलाय. पाहुया त्यांनी नेमके किती प्रश्न उपस्थित केले आणि खासदार निधी किती उपयोगात आणला ते…

खासदार निधीचे प्रगतीपुस्तक

  • * खासदाराचे नाव – हंसराज अहिर
  • * मतदारसंघाचे नाव – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
  • * उपलब्ध निधी – 19 कोटी रुपये
  • * मंजूर निधी – 15 कोटी रुपये
  • * खर्च केलेला निधी – 12 कोटी रुपये
  • * खासदार निधीचा एकूण वापर – 85 %

 सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या

  • * स्वतंत्रपणे: 26
  • * संयुक्तपणे: 23
  • * एकूण: 49

कोळशाच्या खाणी काहींसाठी सोन्याच्या खाणी ठरल्या. पण चंद्रपूरच्या लोकांच्या आरोग्याचा मात्र कोळसा झाला. इथल्या औष्णिक विद्युत केंद्रांनी राज्यभर वीज पुरवली. पण इथल्या जंगलातल्या आदिवासीच्या जगण्यातला काळाकुट्ट अंधार मात्र तसाच राहिला. आदिवासींना वन हक्क देणारा ऐतिहासिक कायदा झाला. पण इथल्या आदिवासींना ना वन हक्काच्या जमिनी मिळाल्या, ना खाणींमध्ये जमिनी गेलेल्यांचं पुनर्वसन झालं. चंद्रपूर हे सरसंघचालक मोहन भागवत यांचं जन्मगाव. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगट्टीवार यांचाही मतदारसंघ. त्यामुळे अहिरांची कारकीर्द ही भाजपसह संघासाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.

close