‘पुणे व्हाया बिहार’ -शीर्षकच फक्त आकर्षक !

February 1, 2014 7:35 PM0 commentsViews: 956

अमोल परचुरे, समीक्षक

पुणे व्हाया बिहार… सिनेमाचं नाव आकर्षक आहे, पुण्याचा मुलगा, बिहारची मुलगी आणि त्यांची प्रेमकहाणी. योगायोग म्हणजे गेल्यावर्षी साधारण याचवेळी मराठी मुलगा आणि पंजाबी मुलीची लव्हस्टोरी ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’मध्ये दिसली होती. मराठीत कथा-कल्पनेचं सीमोल्लंघन होत असलं तरी प्रत्यक्ष सिनेमात फारसा दम दिसत नाहीये. तरुणाईला थिएटरकडे ओढण्यासाठी बरेच प्रयत्न होत आहेत, पण ते केवळ कागदावरच राहतायत की, काय असा प्रश्न पुणे व्हाया बिहार बघून मनात येतो. मांडणीत काही नावीन्य नाही, फक्त चेहरे बदलतात बाकी सगळा मसाला तोच असतो. पुणे व्हाया बिहार हे याचंच एक उदाहरण…लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये आत्तापर्यंत बरेच प्रयोग केलेले आहेत, पण मोठ्या पडद्यावर साचेबद्ध प्रकारेच सिनेमे करण्यावर त्यांचा भर राहिलेला आहे. सिनेमातली एकमेव जमून आलेली गोष्ट म्हणजे बिहारी वाटावेत अशा सह-कलाकारांची निवड…बाकी सिनेमात प्रेमाचा, विनोदाचा, ऍक्शनचा सगळा टिपिकल मामला आहे.

काय आहे स्टोरी?
Pune-Via-Bihar-Upcoming-marathi-movie
अभिजीत भोसले आणि तारा यादव, दोघेजण औरंगाबादच्या कॉलेजमध्ये शिकतायत. अभिजीत मूळचा पुण्याचा आणि तारा यादव, बिहारमधल्या एका वजनदार राजकीय नेत्याची मुलगी. तिच्या वडिलांनी तिचं लग्न लल्लन यादवशी ठरवलेलं, पण ताराला मनाविरुद्ध लग्न करायचं नाहीये. लल्लन यादवसारख्या गुंडाबरोबर तर नाहीच नाही. म्हणून मग तिचे मित्र-मैत्रीण तिला पळून जायला मदत करतात आणि शेवटी अर्थातच नायक-नायिकेचं मिलन होतं. दरम्यान, बरंच काही घडतं. रामलाल यादव यांनी मुलीला शोधायला निंबाळकर नावाच्या एन्काऊंटर स्पेशालिस्टला कामाला लावलेलं असतं. त्याच्यापासून तारा आणि गँग स्वत:ला वाचवत असतात. ‘डोली सजाके रखना’, ‘बरसात’, ‘बागी’, ‘हमसे है मुकाबला’ अशा हिंदी सिनेमांमध्ये जे बघून झालंय त्याचंच मराठी व्हर्जन या सिनेमात बघायला मिळतं.

नवीन काय ?
3453 pune via bihar
खरंतर, लेखक-दिग्दर्शकानं सर्वांना आवडेल अशी मसालेदार भेळ तयार करण्याचा प्रयत्न केलाय. प्रेमकहाणी बरोबरच, त्यात अगदी आयटम साँग आणि ऍक्शन वगैरे मिक्स केलेलं आहे. मराठी आणि बिहारी वादाचा टच असणारे आणि मराठीप्रेमाने फुरफुरलेले संवादही पेरण्यात आलेत. या संवादांना टाळ्याही मिळतात. पण त्यामुळे सिनेमा चांगला ठरत नाही. ऍक्शन तर अगदीच मिळमिळीत आहे. गाण्यांमध्येही फारसा दम नाही. भरत जाधवने एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस ऑफिसर निंबाळकर कडक पेश केलाय, पण मध्येमध्ये उगाच कॉमेडी करायची त्याची हुक्की दिसतेच. अरुण नलावडे यांनीसुद्धा उमेश कामतच्या वडिलांच्या रोलमध्ये बर्‍यापैकी धमाल केलीये. लेखनात अनेक ठिकाणी ‘फू बाई फू’चा प्रभावही जाणवतोच. क्लायमॅक्स तर प्रचंड हास्यास्पद झालेला आहे. असं बरंच व्हाया व्हाया सांगता येईल, पण थोडक्यात सांगायचं तर नाव मोठं, लक्षण छोटं असंच या सिनेमाचं झालंय.

रेटिंग : पुणे व्हाया बिहार – 30

close