‘आप’ला बंडोबांचा ताप

February 3, 2014 2:06 PM0 commentsViews: 894

Image kejriwal345634_300x255.jpg03 फेब्रुवारी : दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. आता तर दिल्ली सरकारच धोक्यात येण्याची शक्यता आहे. तीन आमदारांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, असा इशारा दिला आहे. हे तीन आमदार म्हणजे ‘आप’चे बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी, जेडीयूचे शोएब इकबाल आणि अपक्ष आमदार रामबीर शोकीन.

शोएब इकबाल हे आज दुपारी साडे बारा वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटणार आहेत. बिन्नी आणि शोकीनही इकबाल यांच्याबरोबर या भेटीला जाण्याची शक्यता आहे. 48 तासांत आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पाठिंबा काढून घेऊ, अशी तंबी या तिघांनी सरकारला दिली आहे. आपल्याला आणखी दोन आमदारांचा पाठिंबा आहे, ज्यात शिरोमणी अकाली दलच्या एका आमदाराचाही समावेश आहे असंही या आमदारांनी म्हटलं आहे. जर त्यांनी पाठिंबा काढला तर 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत सरकारमध्ये फक्त 35 आमदार राहतील.

दरम्यान, आपचं सरकार पाडण्यासाठी आपल्याला 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आपचे आमदार मदनलाल यांनी केला आहे. ऑफर देणारी व्यक्ती गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जवळची असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या डिसेंबरमध्येच पक्ष सोडण्यासाठी आपल्याला ही ऑफर मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं निलंबित आमदार विनोदकुमार बिन्नी आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिरसा यांनी सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान जेडीयूचे आमदार शोएब इकबाल आणि अपक्ष आमदार रामबीर शोक्कन हे उद्या नायब राज्यपालांची भेट घेतील.

close