प्रत्येकाच्याच मनातला ‘फँड्री’

February 3, 2014 7:06 PM1 commentViews: 3926

sonali deshpande ibn lokmat- सोनाली देशपांडे,सीनिअर असोसिएट एडिटर,IBN लोकमत

नागराज मंजुळेचा ‘फँड्री’ पाहिला. अगदी मातीतला हा सिनेमा. गावात डुकरांना पकडून रोजीरोटी करणारं एक घर. घरात अठराविश्‍व दारिद्र्य. घरातला मुलगा जांबुवंत शाळेत जातोय. शाळेत त्याला शालू नावाची एक मुलगी आवडतेय. तिची स्वप्न तो पाहतोय, तिला पाहण्याची जशी संधी मिळेल तशी तो घेतोय. पण तिच्याशी संवाद शून्य…हे सगळं लांबूनच…गावामधल्या शाळांमध्ये असं काही होत असतंच. पण हे इतकं साधं नाहीय. ही काही वयात येणार्‍या मुलाची प्रेमकथाही नाही. हा सिनेमा बर्‍याच गोष्टी अधोरेखित करतोय.

आहे रे आणि नाही रे या वर्गातली दरी मोठी आहे. जांबुवंत ऊर्फ जब्या हा कथित कनिष्ठ वर्गातला तर त्याला आवडलेली शालू ही तथाकथित उच्च वर्गातली. जब्या शालूच्या मागे मागे फिरतोय. पण शालू त्याची दखलही घेत नाहीय. मग ही दरी कशी बुजणार? ती वाढतच जाणार.. शालूच्या वर्गातली माणसं जांबुवंतच्या कुटुंबाचा उपयोग कामासाठी करून घेतात. पण एरवी त्यांना हडतूडच करतायत. त्यांची चेष्टा करतायत. त्याला फँड्री म्हणून चिडवतात. जब्याला हे सगळं बदलायचंय. त्यासाठी तो त्याच्या परीनं धडपड करतोय.. त्याला आपल्या वडिलांसारखं डुक्कर पकडायला जायचं नाहीय. जब्या अभ्यासही करतोय. उलट त्याच्या घरात त्याच्या शिक्षणाबद्दल उदासीनताच आहे. आपल्या शाळा सोबतींसमोर आपली प्रतिमा चांगली राहावी, उच्च वर्गातल्या लोकांसारखं आपण दिसावं, यासाठी जांबुवंत धडपडतोय. पण काहीच उपयोग होत नाहीय. ना इतर वर्गातले त्याला स्वीकारतायत, ना त्याच्या घरचे त्याला बदलू देतायत. जंब्याची गोष्ट सांगताना दिग्दर्शक सामाजिक भाष्यच करून जातो. साधा, सरळ, शांत जंब्या शेवटी हिंसक होतो, चिडून उठतो आणि त्याच्या या वागण्यामागचे सगळे कंगोरे प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जातात.
fandry marathi movie
हा सिनेमा वर्गभेदापलीकडेही जातो. हा फँड्री प्रत्येकाच्याच मनात असलेला. जंब्याला मिळणारी वागणूक, नकार हा प्रत्येकानंच कधी ना कधी अनुभवलेला. नकार देणारा आपल्यापेक्षा कशात तरी वरचढ असतो आणि मग आपल्याहून ठराविक गोष्टीत कमतरता असणार्‍याला तो नाकारतो. मग हा नकार प्रेमातला असू शकतो, अधिकारांसाठीचा असू शकतो, पैशासाठी असू शकतो. नकार कशासाठी आहे हे महत्त्वाचं ठरत नाही. पण अमुक अमुक गोष्टीसाठी तू नाहीस..हे तुझ्यासाठी नाही. तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त अक्कल आहे..अशी भावना दुसर्‍याला वाटावी अशी परिस्थिती निर्माण करणारे आजूबाजूला कमी का असतात? म्हणूनच प्रत्येकाच्या मनात फँड्री असतो.

या सिनेमासाठी निवडलेले कलाकारही पहिल्यांदाच कॅमेर्‍यासमोर आले होते आणि त्यांच्याकडून सहजतेनं काम काढून घेण्याचं कौशल्य दिग्दर्शकानं दाखवलं. सिनेमातली छोटी छोटी दृश्यंही अर्थपूर्ण आहेत. ती उगाचंच नाहीयत. जब्याचं कुटुंब डुक्कर पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करतंय. त्यासाठी त्यांना पाटलांकडून पैसे मिळालेत. डुक्कर आता पकडलं जाणार आणि इतक्यात समोरच्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होतं आणि मग उभं राहण्यावाचून गत्यंतर नसतं आणि डुक्कर मात्र शांतपणे निघून जातं. पुढे हाच सिनेमाचा टर्निंग पॉइंट ठरतो. असे छोटे प्रसंग खूप आहेत. फँड्री संवेदनशील प्रेक्षकांसाठी एक चांगला अनुभव ठरेल हे नक्की..आणि विचार करायला लावणारा, संवेदना धारदार करून देणारा सिनेमा म्हणून फँड्रीचं योगदान खूप मोठं आहे.

 • umesh jadhav

  एखाद्या चित्रपटाचं
  आणि ते ही ज्या मध्ये एक अतिशय संवेदनशील विषय मांडलाय त्याचं याच्या पेक्षा
  चांगलं परीक्षण असूच शकत नाही असं मला वाटतं.आपल्या कडे अशा बऱ्याच कलाकृती आहेत
  ज्यांवर एक विशिष्ट प्रकारचा शिक्का मारून त्या अडगळीत टाकल्या गेल्या
  आहेत.एखाद्या कलाकृतीचं शहरी, ग्रामीण,वर्गीय,जातीय,भाषिक,प्रायोगिक,हौशी,व्यावसायिक
  वगैरे वगैरे असं वर्गीकरण केलं तर आपसूकच त्याचं एक्सेप्टन्स आपण मर्यादित करतोय
  आणि त्या कलाकृतीवर आणि ज्यांनी त्यावर मेहनत घेतलीय त्यांच्यावर अन्याय करतोय
  याचं बऱ्याच समीक्षकांना भान राहत नाही.तुम्ही दिग्दर्शक मुंजळेना काय एक्स्पेक्ट असावं
  किंवा आहे नेमकं तेच थोडक्यात पण खूप प्रभावीपणे मांडलंय.

close