स्वस्त घरांच्या अफवेमागे महाराष्ट्र लोकशाही आघाडी

February 5, 2014 2:00 PM0 commentsViews: 1070

swasta ghar05 फेब्रुवारी :  मुंबईतल्या पवई सारख्या उच्चभ्रू परिसरात अवघ्या 54 हजार रुपयांत घर मिळण्याची अफवा काल वांद्रे परिसरात पसरली आणि अवघ्या काही तासातच मंत्रालयाबाहेर लोकांची गर्दी होऊ लागली. पण, ही अफवा नव्हती तर सरकारची पोलखोल करण्यासाठी आम्हीच असे फॉर्म छापले, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे मिलिंद रानडे यांनी दिलंय.

गरिबांसाठी स्वस्त घरांची योजना मुख्यमंत्र्यांनी आणली होती. पण, ती पूर्ण झाली नाही. याविरोधात आंदोलन म्हणून आम्ही हे फॉर्म छापले आणि लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज करावे, असा उपरोधिक सल्ला दिला, असं स्पष्टीकरण रानडे यांनी दिलंय. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक आहेत. पण, या सल्ल्यातला उपरोध न समजल्यामुळे गैरसमज झाला. 54 हजारात खरंच घर मिळतं आहे, असं वाटून मुंबईभरातल्या गोरगरिबांनी रात्रीपासून मंत्रालयाबाहेर रांगा लावल्या.

पवई एरिआ डेव्हलपमेंट अंतर्गत 400स्क्वेअर फुटांची घरं फक्त 54 हजारांना देण्यात येतील, अशा प्रकारचे फॉर्म दोन दिवसांपूर्वी वाटले गेले होते. आता हे फॉर्म बनावट असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही दिलेत. तरीही आज दुसर्‍या दिवशीही मंत्रालयाबाहेर गर्दी उसळली होती. या बनावट फॉर्मसाठी लोकांकडून प्रत्येकी 10 ते 400 रुपयांपर्यंत घेण्यात आल्याची तक्रारही लोकांनी केली आहे. यापैकी अनेकजण अशिक्षित आहेत आणि त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचं चित्र दिसतंय.

दरम्यान, स्वस्त घरांचे फॉर्म खोटे असून सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचं मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीही स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर लोकांनी यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन ही त्यांनी केलं आहे. हा लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे. लोकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असं आवाहनही कृष्णप्रकाश यांनी केलंय. तर या प्रकरणी तक्रारीची वाट न बघता पोलीसही स्वत: कारवाई करतील, असंही अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले.

close