कोल्हापुरात सर्व नगरसेवकांचे राजीनामे, टोलवसुली सुरूच!

February 5, 2014 3:12 PM0 commentsViews: 1487

kolhapur toll05 फेब्रुवारी : कोल्हापूरमध्ये पुन्हा टोलविरोधातलं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. सकाळपासून शहरात टोलवसुलीला सुरुवात झाल्यावर कोल्हापूरच्या नगरसेवकांनी महापालिकेत एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आता सगळ्या नगरसेवकांनी आपले राजीनामे महापौर सुनिता राऊत यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

मात्र त्यानंतर आता नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी शिरोली टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन करत टोलवसुली बंद पाडली. यावेळी काही नगरसेवक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. त्याचवेळी शहराच्या महापौर सुनिता राऊत यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांनाही लाठी लागल्याचा आरोप केलाय.

त्यामुळे कोल्हपूरमध्ये पोलिसांविरोधात आता संतापाचं वातावरण असून आज संध्याकाळी प्रा. एन.डी.पाटील यांच्या घरी टोलविरोधी कृती समितीची एक बैठक होणार असून त्यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. तसंच उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्याचा निर्णयही नगरसेवकांनी घेतलाय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातल्या 9 टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी टोलविरोधी कृती समितीने केली आहे.

 

close